शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

प्रिय नानासाहेब यांस,

PR


(ज्येष्ठ साहित्यिक, निरूपणकार, टिकाकार ‘वक्ता दशसहेस्त्रेशु’, नि अशा अनेक व्यक्तिमत्वांचे धनी असलेल्या प्रा. रामभाऊ शेवाळकर यांचे गेल्या महिन्यात तीन मेस निधन झाले. त्यांच्या मासिक श्राद्धानिमित्त, सुरेश तांबोळी सर या त्यांच्या सुह्रृदाने वाहिलेली ही शब्दांजली....)

आदरणीय नानासाहेब (प्राचार्य डॉ. रामभाऊ शेवाळकर) यांना आपण जिथं कुठं असाल, तिथं तुम्हाला साष्टांग प्रणिपात!

मंगेशकर बंधू-भगिनी, दिग्दर्शक राजदत्त, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, खिरोद्याचे (फैजपूर) मधुकरराव चौधरी, ज्योतिर्भास्कर साळगांवकर, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी, नानाजी देशमुख, प्रवरानगरचे विखे-पाटील, अण्णा हजारे, विदर्भ संत गणपती-महाराज, आकाशानंद या नामांकितांसोबतच आम्हा सार्‍यांनाच - म्हणजे कल्याणचे चंदूकाका पांडे, अमरावतीचे तारे काका, वसेरा येथील भिडे परिवार, वणीचे काकाजी जायस्वाल व बाळासाहेब सरपटवार, नाशिकचे सुरेशजी अवधूत, मी स्वत: असे अनेक मित्र आपल्या सेवकवर्गापैकी तिवारीजी व श्री पेठकर मीना बक्षी आपले चक्रचालक बापूराव, नागपूरच्या संत्रा-मार्केटमधील ते आपले विक्रेते मानसपुत्र गुलाब प्रल्हाद आपल्या शेकडो मानसकन्या या सोबतच आपल्या गोठ्यातील ती कपिला गाय सार्‍यांनाच आपण अनाथ केलंय बाबा!

आयुष्यभर ज्ञानाची सदावर्त घालून ज्या लक्षावधी विद्यार्थ्यांना आपण घडविलत त्यांना आणि शेकडो सहकार्‍यांनाही आपण निराधार करून गेलात! विदर्भात तुम्हीच केलेल्या विदर्भ-साहित्य-संघाच्या शाखासुद्धा आता छत्रहीन होऊन गेल्यात. आचार्य विनोबा हे आणि मामा क्षीरसागर यांच्या सुजाण विचारशक्तीतून कार्य प्रवास झालेलं आणि तुमच्या पालकत्वातून बहरास आलेलं आचार्यकुल तर नाना पुरतं बेघर झालंय बघा! नानासाहेब, तुम्ही प्रतिवर्षी गाजवत असलेल्या त्या दमदार व्याख्यानमालाच आणि शानदार कीर्तन संमेलनांच सौभाग्यही आपल्या प्रयासामुळे कोमजून गेलंय! आपण असं एकाएकी मौन धारण केल्यामुळे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना आता 'जुगलबंदी'साठी दुसरा कोणता जोडीदार निवडावा बरं? अहो सर, नाशिकच्या भाऊ सारडांनी, मलकापूरच्या डॉ. गर्गे-शुक्ल या जोडगोळीनं आणि इगतपुरीच्या विनय व माधवी तांबोळी या भावंडांनी वर्षानुवर्षं चालविलेल्या व्याख्यानमालांची पुष्प गुंफायला आता कुणास पाचारण करायचं? त्या वाचस्पतीचं नाव तर जरा कानात सांगून ठेवा!

केवळ आचार्यकुल आणि विदर्भ-साहित्य-संघाचंच नव्हे तर स्वामी रामानंद-तीर्थ-प्रतिष्ठान, अंतरभारतीय कीर्तनकुल, महायोगी सेवा-समिती, राष्ट्रभाषा सभा, सानेगुरुजी कथामाला आणि आमचा ज्ञानदीप-महासंघ यांचं सुजाण मार्गदर्शन कुणी करायचं? बाबा आमटेंच्या माघारी साधनाताई आमटे आणि प्रकाश व विकास आमटे यांना तुमचा एका खंदा आधार होता. आपण असं अचानक गेलात आणि वरोर्‍याच्या 'नंदनवनाचा' खंदा खांदाच निखळून पडलाय.

नाना! हे क्षणभर बाजूला ठेवू. पण गेली शेकडो वर्ष ज्यांचं अभिजात संस्कृत साहित्य एका रसिकाग्रणीच्या प्रतीक्षेत होतं त्या कवी-कुलगुरू कालिदास, भास, भवकर्ता, माघ, दंडी आणि बाणभट्ट त्याला प्राचीन संत व पंत कवींच्या काव्याला आणि अर्वाचीन काळातील केशवसुत, यशवंत, गिरीश, मर्ढेकर, कुसुमाग्रज तुमच्या समकालीन सुरेश भट-ग्रेस यांच्यापर्यंतचं सारं काव्य तुमच्यासारखा रसीला समीक्षक-शिक्षक लाभून मोहोरून उठलं होतं. त्या सार्‍या साहित्याची अमृतशिंपण आता कुणी करायची? त्या ज्ञानियाच्या राणाच्या ओव्यांचं भावसौंदर्य कुणी विशद करायचं बरं?

नाना अजून तरी सामोरे या हो! निदान माझ्या हाकेला होकार द्या की. ही बघा महाभारतातली तुम्ही जागृत केलेली स्त्री-शक्ती भरजरी पैठण्या नेसून विंगेत उभीय. तुमचा आवाज कानी पडून सजीव व्हायला रंगमंचावर साकार व्हायला अधीर होऊन उभीय ती 1957 ची रणरागिणी लक्ष्मीबाई, ते शिवराय शत्रूचं पारिपत्य करायला तलवार उपसून सज्ज आहेत, तुमच्या ओजस्वी शब्दाच्याच प्रतीक्षेत!

स्वामी विवेकानंद स्वधर्माची पताका फडकविण्यासाठी तुमच्या एकेक शब्दाची प्रतीक्षा करताहेत. तसंच ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि देश गौरव सुभाषबाबू यांच्याच जोडीला बापूजी, विनोबा आणि पंडितजी Entry साठी तुमच्या शब्दांच वाट पाहताहेत, सर! या एवढ्या सार्‍या मंडळींना किती वेळ खोळंबून ठेवणार विंगेतच.

आता या सार्‍यांना लेखणी आणि वाणीने कोण जागविणार? आपल्या लेखनिकेनं आपल्या या गैरहजेरीत कोणाचं 'डिक्टेशन' घ्यायचं? आणि ग्रंथपालानं कुणासाठी संदर्भ शोधायचे? तिवारीजींची गरमा-गरम पोळीची 'ऑर्डर' कुणाकडून घ्यायची? बाहेरून श्रम-श्रांत होऊन घरी परतल्यावर आशुदादाला 'आशुड्या' ही श्रमपरिहार करणारी प्रेमभरी हाक कुणी मारायाची? दर वाढदिवसाला विजया वहिनींना 'चक्क कोरा चेक' कोण देणार? मनीषानं बनविलेल्या लज्जतदार गाजर हलव्याला कौतुकाची 'दाद' कोण देणार? काही चांगलं घडलं, केलं की पाठीवर मिळणारी ती आत्मीय शाबासकीची थाप तुमच्या गैरहजेरीत कोण देणार हो, सर?

नानासाहेब, आपल्या त्या मायाळू चर्येच दर्शन आणि आपल्या अमीट गोडीच्या शब्दांची आम्हाला इतकी सवय झालंय की तुमची लपाछपी आणि अबोला यांनी आम्ही सारेच हैराण झाले आहोत बघा! आता साहित्य शारदेच्या मंदिराच्या नंदादीप आम्ही शोधायचा कुठून? नाना! अहो नाना! मी केव्हाचं बडबडतोय वेड्यासारखं, पण तुम्ही एक शब्दही बोलायला तयार नाहीत. हवं असेल तर दोन फटके मारा पण असा अबोला, असा दुरावा नका हो दाखवू?

कबूल आहे मला! गेले बरेच महिने तुमच्या भेटीला येणार-येणार म्हणून जाहिराती फडकावून सुद्धा येऊ शकलो नाही मी. त्याचा राग आलाय तुम्हाला! साहजिक आहे पण त्यासाठी माझ्याशी कट्टी घेऊ शकता तुम्ही. पण आपल्या ओजस्वी वैखरीचं 'पसायदान' मागायला दस्तूरखुद्द लतादीदी आणि पंडितजी ही मंगेशकर भावंड खोळंबून बसली आहेत. त्यांच्या ' अमृताचा धनू' पुन्हा साकार करायला. सर, निदान त्यांच्याशी तर अबोला सोडा. नाहीतर त्यांनी कोणत्या वाचस्पतीला साकडं घालावं, हे तरी सांगा की!

नाना, तुमच्या रसपूर्ण व्याख्यांनांची मलई-कुल्फी खायला सोकावलेल्या आम्ही श्रोत्यांनी या कडक उन्हाळ्याच्या जीवघेण्या काहिलीत आता शब्दशीतलतेचा गारवा शोधायचा तरी कुठून? इगतपुरी तालुक्यात आपल्या प्रेरणेतून प्रारंभ करून आम्ही पूर्णत्वाला आणलेल्या सामाजिक प्रकल्पानं 'स्वरित-शुभाषीष' देणार तरी कोण?

आम्ही वयानं मोठी असलेली माणसं एकवेळ हे समजून घेऊ पण तुमची ती लाडकी चिमुरडी आपाला तिच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची याचा तरी निदान उलगडा करा बुवा. आणि मग पाहिजे असेल तर मग सगळ्यांशी कट्टी घ्या. हवी तर! नाना, तुम्ही मनानं मायाळू आहात, कनवाळू आहात, चुकलं-माकलं माफ करा निदान दोन शब्द तरी बोला हो नाना.

आपला,
सु. दि. ताबोळी, सर
महासंघाध्यक्ष
अ. भा. ज्ञानदीप मंडळ महासंघ, मुंबई