Last Modified: सांगली , शनिवार, 19 जानेवारी 2008 (13:33 IST)
साहित्यातून नव्या जाणीवा मिळाव्यातः राष्ट्रपती
साहित्य अक्षय टिकणारे आहे. त्याला मरण नाही. करमणूक हाच केवळ साहित्याचा हेतू नाही. तर त्यातून नव्या जाणीवाही मिळायला हव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज सांगली येथे व्यक्त केली. ८१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज श्रीमती पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपतींकडून झाले. आपल्या छोट्या पण अतिशय मर्मज्ञ भाषणात प्रतिभाताईंनी मराठी साहित्याचा आढावा घेतानाच त्याची दिशाही स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, इतर कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राला विशाल संतपरंपरा लाभली आहे. या परंपरेच्या माध्यमातून अक्षय असे संत साहित्य मिळाले. त्यामुळे संत साहित्य हा मराठीचा गाभा आहे.
खास संमेलनासाठी उभारलेल्या दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील नगरीत आज एका दिमाखदार सोहळयात राष्ट्रपतींच्या हस्ते या संमेलनाचे उद्गाटन झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. म. द. हातकणंगलेकर, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे, पालकमंत्री पतंगराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
स्त्रीसाहित्याबद्दल बोलताना प्रतिभाताई म्हणाल्या, की स्त्रीमुक्तीवाद मराठी साहित्याला नवा नाही. वा तो कुठून आयातही करावा लागलेला नाही. तो मराठी साहित्यात उपजतच आहे. ताराबाई शिंदे, बहिणाबाई चौधरी या स्त्री साहित्यिकांचा उल्लेख करत मराठी स्त्रियाही पुरूषांच्या तुलनेत सृजनशील आहेत, हेही त्यांनी दाखवून दिले.
दरम्यान,शारदेचा हा उत्सव आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हजारो शारदोपासक येथे आले आहेत. राष्ट्रपती येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदूनच रसिकांना या सोहळ्याला यावे लागले.