गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

संमेलनाचा आशयगाभा हरवत आहे - प्रा. महाजन

WDWD
आजचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ग्रंथोत्तेजक परीषद या नावाने प्रारंभी सुरू झाले. न्या. महादेव गोविंद रानडे यांची ही कल्पना होती. वेगवेगळ्या विषयात ग्रंथनिर्मिती करण्यार्‍यांनी एकत्र यावे, ग्रंथनिर्मितीतील अडीअडचणी व प्रश्न समजावून घ्यावेत परस्परांशी विचार विनिमय करावा व त्यातून भविष्यकाळाकरीता एक सार्वत्रिक सांस्कृतिक सुसंवाद निर्माण व्हावा, ही यामागची मुळ कल्पना होती. या ग्रंथोत्तेजक परिषदेचे निमंत्रण महात्मा फुले यांना देण्यात आले, त्यावेळी त्यांनी परिषदेला जे पत्र लिहिले ते आजही उपलब्ध असून म. फुले यांची त्यामागील भूमिका अत्यंत्त योग्य व संपूणे परिषदेस अंतर्मुख होऊन विचार करावयास लावणारी होती, हेही आज सर्वज्ञात आहे.

कालांतराने याच परिषदेचे साहित्य संमेलन झाले. दरम्यानच्या काळात रवीकिरण मंडळात सात कवी व एक कवयित्री एकत्र येऊन सामूहिक पध्दतीने काव्यलेखन करण्याचा प्रयोगही झाल्याचे आपण पाहिले. त्यांच्या या कवी मंडळाला 'सन टी क्लब' असे नामाभिधानही देण्यात आलेले होते. म्हणजे सामुहिक पद्धतीने एकत्र येऊन साहित्यिक चर्चा करण्याचे प्रयत्न याकाळात झालेले दिसतात. तथापि हे सर्व एका विशिष्ठ परिघातच फिरत राहणारे असल्याने त्याला सार्वत्रिक स्वरूप प्राप्त होऊ शकलेले नव्हते.

संमेलनातून असे स्वरूप प्राप्त होईल अशी अपेक्षा होती. आज तसे काहीसे सुखद चित्र जरी दिसत असले तरी पुन्हा मराठी साहित्य महामंडळ, त्याच्या घटक संस्था ही एक नवी कंपुशाही निर्माण झाली असल्याचे गेल्या काही वर्षांत स्पष्ट झालेले आहे. साहित्य व्यवहार सार्वत्रिक होण्यास आणि त्याचा सर्वदूर प्रसार होण्यात ही कंपुशाही अडथळा निर्माण करते आहे, हे आता मान्य होण्यास हरकत नाही.

मुख्य प्रवाहातील प्रतिवर्षी साजर्‍या होणार्‍या या संमेलनासच आपण आज मध्यवर्ती साहित्य संमेलन म्हणतो आणि त्याचे अध्यक्षपद मिळणे हा पण मोठा बहुमान मानतो. गेल्या काही वर्षांत संमेलनाला जे उत्सवी स्वरूप आले आहे ते लक्षात घेतले तर ते स्वाभाविकच आहे. असेही म्हणावे लागते. यामध्ये महामंडळ हे संमेलन भरविणारे अधिकृत असे प्रातिनिधीक मंडळ असते, असे जर मानले तर संमेलन भरविणारी संयोजक संस्था ही यातील दुसरी जबाबदार संस्था असते. संयोजन करणार्‍या समितीला स्वागत समितीचा व स्वागत समितीतील मतांचा अधिकार व सन्मान प्राप्त होत असतो पण, अध्यक्षपदाकरीता मात्र सरळ निवडणूकच होत असते. लोकशाहीमध्ये आपण कितीही चर्चा केली तरी या क्षणीतरी या व्यवस्थेला काही पर्यायी व्यवस्था आहे, असे वाटत नाही.

त्यामुळे साहित्य महामंडळ व सर्व घटक संस्था यामध्ये अधिकाधिक पारदर्शकता असणे हे फार गरजेचे आहे. तशी ती नसेल तर संमेलनाच्या निमित्ताने जे संशयाचे धुके निर्माण होते, त्यातून पुन्हा साहित्याचे आभाळ निरभ्र करणे हे आणखी एक वेगळेच काम होऊन बसते. काही वर्षापूर्वी क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी याबाबत वाळवा या ठिकाणी दलित आदिवासी व ग्रामीण अशा तीन प्रवाहांचा एकत्रित संमेलन घेण्याच जो प्रयोग केला होता तो अत्यंत स्तुत्य व तितकाच स्वागतार्ह होता. इथे साहित्यिकांची व्यवस्था वाळवेकरांच्या घरात करण्यात आली होती आणि सामुहिक भोजन व सामुहिक विचारांचे आदानप्रदान अशी व्यवस्था काटेकोरपणे सिध्द करण्यात आली होती.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात या संमेलनांचे निश्चितच मोल आहे. भविष्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साहित्य रसिकांपासून अनेकविध कारणांनी दूर जाईल की काय अशी भीती वाटत आहे. तसे झाले तर फारसे वाईट वाटण्याचे कारण नाही. कारण भविष्यात आज जी छोटी छोटी संमेलने होत आहेत तीच आशयसंपन्नतेचे रास्त स्वरूप धारण करून साहित्य व्यवहार व विचारांना नवी दिशा देतील व साहित्य रसिकांकरीता प्रेरणादायी होतील असे वाटते.

21 व्या शतकात असे होईल हे कवीवर्य कुसुमागज यांचे भाष्य नजीकच्या काळात खरे ठरणार असे आजच्या साहित्य संमेलनाचे स्वरूप झालेले आहे. ते साहित्य रसिकांना काळजी करण्यासारखे वाटले तर त्यात मुळीच नवल वाटण्याचे कारण नाही.

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य परीषद सांगली शाखेचे अध्यक्ष आहेत.)