शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

महाराष्ट्रीयन दागिन्यांचे प्रकार

कोणत्याही सोहळ्यातीलच नव्हे तर स्त्रियांच्या जीवनातील महत्वाचा भाग असतात ते म्हणजे दागिने. महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. अधून-मधून पारंपरिक दागिन्यांची क्रेझ येते आणि ते दागिने जुन्या प्रकारचे असली तरी तरुण पीढीवरही उठून दिसतात. अशात आपली परंपरा टिकून असल्याचा आनंद तर मिळतोच आणि पारंपरिक दागिन्यांची मागणी वाढली की त्यात नवीनपणा दिसून येतो. तर चला जाणून घेऊ या महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांचे नाव आणि त्यांच्याबद्दल माहिती-
 
गळ्यांतले दागिने
ठुशी - हा दागिना गळ्यालगत घातला जातो. यात बारीक मणी ठासून भरेलेले असतात म्हणून याला ठुशी म्हणतात.  ठुशीचे काही प्रकार आहेत जसे साधी ठुशी, मोरणी ठुशी, मोहनमाळ ठुशी, गोलमणी किंवा पेडंट असलेली ठुशी.
 
राणी हार - दोन किंवा तीन पदरी अशा राणीहाराच्या प्रत्येक पदराला बारीक डीझाईन असते.
 
चिंचपेटी - गळ्यालगत घातली जाणारी चिंचपेटी. मोत्यामध्ये गुफंण केले जाते. किर्तीमुख आणि मत्स्य असे नक्षीकाम यावर केलेलं असतं.
 
कोल्हापुरी साज - नावावरुनच कळून येतं की हा कोल्हापुरचा दागिना आहे. लाखेवर तयार केल्या जाणार्‍या या दागिन्यावर जावमणी आणि पानड्या कंवा वेगवेगळ्या आकारांची पाने गुंफली जातात. याशिवाय या हारमध्ये चंद्र, शंख, कासव, भुंगा तर बेलपान अशी शुभ शकुने असणार्‍या गोष्टी असतात.
 
बोरमाळ - या माळीत लहान बोरांच्या आकारासारखे मणी गुंफले जातात. म्हणून याला बोरमाळ असे म्हणतात.
 
पुतळी हार - पुतळी हार दोऱ्यामध्ये ओवलेला असतो. 
 
चपला हार - चपटया नाण्यांप्रमाणे गुंफलेला हार म्हणजे चपला हार.
 
पुतळी चपला हार - पुतळी हार यामध्ये चपटे नाणी लावल्यावर तो पुतळी चपला हार होतो.
 
मंगळसुत्र - मंगळसुत्र हा सौभाग्यवती स्त्रीचा अलंकार असून यात दोन वाट्या असतात.
 
मोहनमाळ - गळ्यात घालत असलेला एक अलंकार जो तीन पदरी असतो.
या व्यतिरिक्त एकदाणी, एकसर, कंठा, कंठी, कंठीहार, काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, चंद्रहार, चपलाकंठी, चाफेकळी माळ, चोकर, चितांग, चौसरा, जोंधळी पोत, टीकमणी, सर, वज्रटिक, डोरले, डाळी टिका, तन्मणी, ताईत, तांदळी पोत, तायत्या, दुल्लडी, नळ्याची पोत, पाभर, पोहेहार, बकुळहार, लड, लफ्फा, लक्ष्मीहार, वज्रटीक, शिरण, श्रीमंतहार, सर, सरी, साखळी, हरपर रेवडी हार, वाघनखे, फलकमाला इत्यादींचा समावेश आहे.
 
केसात घालायचे दागिने
फुले - सतराव्या शतकापासून प्रचलित फुले अंबाडा किंवा वेणी सजवण्यासाठी असतात. याचे प्रकार म्हणजे आंबोडयातील फुले, वेणी, गुलाबफुल किंवा नगाचा देखील वापर केला जातो. तर या शिवाय प्रसिद्ध म्हणजे आकडा, सुवर्णफूल, मूद, बिंदी, अग्रफुल, वेणी, तुरा, रत्‍नफुले, रविफूल, सूर्यफूल, सूर्य-चंद्र, वगैरे.
 
कर्णालंकार
कुडी - पेशवाई काळातील प्रसिध्द कुड्यांना सोनं किवा मोती याचे मणी वापरून फुलासारखा आकार दिला जातो. 
 
कर्णफुले - या दागिन्यात पूर्ण कान भरलेला दिसतो.
 
झुमके - झुमक्यांचे पारंपारिक नाव झुबे असे असून हे नेहमी फॅशनमध्ये असतात.
 
बाळी - बाळी म्हणेज तार वळवून कानात अडकून घातला जाणार दागिना. या दागिन्याला फिरकी नसते.
 
वेल - मोती किंवा सोन्याची सर जी कानातून केसात अडकवली जाते.
 
बुगडी - कानाच्या वरच्या कडेच्या पाळीवर मोत्याची बुगडी घातली जाते.
 
कुडकं - कानाच्या आतील बाजूच्या पाळीत कुडकं घातलं जातं.
या शिवाय कुंडल, डूल, भिकबाळी, काप, वेल, सुवर्णफुले, चौकडा इत्यादींचा समावेश आहे.
 
 
 
पायातील दागिने
पैंजण -  पैंजण एकपदरी तर तोरडया जाडजुड आणि एकापेक्षा अधिक पदरीचे असतात. वाळे हे लहान मुलांच्या पायात घालण्याची देखील पध्दत आहे.
या शिवाय चाळ, तोडर, नूपुर, जोडवी, मासोळी, विरोली, मंजीर, वाळा, वेढणी हे देखील पायातील दागिने आहेत.

कमरेवरचे दागिने
कबंरपट्टा - अतिशय जुना असा दागिना कबंरपट्टा राजघराण्यातील राण्या घालत असायच्या. कंबरेवर पट्टा घातल्याने पोटाचा घेर प्रमाणात रहातो असे मानले जाते.
 
मेखला - मेखला कमरेच्या एका बाजुला लटकणारा दागिना आहे ज्यात नक्षीदार साखळी किंवा वेल असते.
 
छल्ला - छल्ल्यात वरच्या बाजुस नक्षीदार काम असतं आणि मागील बाजूस चाव्या अडकविण्यासाठी अडकनसारखी जागा असते.
या शिवाय करदोटा, पोंद, इत्यादींचा समावेश आहे.
 
नाकातले दागिने
नथ - नथ या दागिन्याशिवाय महाराष्ट्रीयन स्त्रीचा श्रृंगार पूर्ण होऊ शकत नाही. नथींचे अनेक प्रकार आहेत. चमकी, लोलक, मोरणी, आणि इतर. नथीत मणी असतात आणि ही नथ नाकात घातली जात असून ओठावर रूळते.

बाजूवरील दागिने
बाजूबंद - दंडावर बांधला जाणार बाजूबंद मोत्याचा किंवा सोन्याचा असू शकतो. 
 
वाकी - वाकी हा दंडावरचा दागिना आहे.
 
नागबंद - वेटोळे घालून बसलेली तशीच फणा उभारलेली अशी सोन्याच्या नाग कृतीच्या रचना यात दागिन्यात बघायला मिळते.
 
नागोत्र - वेटोळयांची भरपूर रूंदी असलेल्या गोलाकार वाकीला नागोत्र असे म्हणतात.
 
तोळेबंद – चटईच्या वाकीसारखीच भक्कम असा अलंकार.
 
वेळा - भक्कम अलंकार ग्रामीण भागात स्त्रियांच्या दंडावर प्रामुख्याने दिसतो.
मनगटातले दागिने
पाटल्या - मूळचा पेशवेकाळीन दागिना म्हणजे पाटल्या. याचे प्रकार - तोडीच्या पाटल्या, जाळीच्या पाटल्या, पुरणाच्या पाटल्या, पोवळ पाटल्या, तसेच मोत्याच्या पाटल्या.
 
बिलवर - पैलू पाडलेल्या बांगडीला बिलवर असे म्हणतात.
 
गोठ - पाटल्या आणि बिलवर याशिवाय गोठ हा दागिनाही प्रामुख्याने घातला जात असे. गोलाकार कांबीचं वळं किंवा भरीव सोन्याचा कडं असे समजावे. 
 
तोडे - मोती आणि लाल खड्यांची साथ असलेले किंवा शुद्ध सोन्याचे तोडे देखील सुरेख दिसतात.
 
गजरा - मोत्यांचे अनेक सर गुंफून गजरा तयार केला जात असे. याला मनगटावर घातले जाते.
 
जवे - जव या धान्याच्या दाण्यांसारखे सोन्याचे मणी बांगडीवर चिकटवल्याने सुंदर देखणा असा दागिना तयार केला जातो.
या शिवाय कंकण, कंगन, शिंदेशाही तोडा, पिछोडी, बांगड्या, इत्यादी.
 
बोटातले दागिने
अंगठी - अंगठ्याचे अनेक प्रकार आहेत जसे विविध मुद्रा, चिन्ह, आरसा असलेल्या अंगठ्या. तर वेढा, वळ किंवा शिक्का, नग, खडे, छल्ला असे अनेक प्रकार वेगवेगळ्या बोटात घालण्याची पध्दत असे. नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, दर्भाची अंगठी, दशांगुळे हे देखील अंगठ्यांचे प्रकार आहेत.