मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (13:14 IST)

कसे पूर्ण कराल तुमचे नवीन वर्षाचे संकल्प?

वजन घटवणं, व्यायाम करणं, सिगरेट सोडणं, नविन भाषा शिकणं... अशा उत्साहानं केलेल्या आणि नंतर मोडलेल्या नववर्ष संकल्पांची यादी आपल्यातला प्रत्येक जण सहज देऊ शकतो.
म्हणूनच बीबीसी रिअॅलिटी चेकनं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, असे कोणते संकल्प असतात जे पाळले जाण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही काय संकल्प करावा हे तर आम्ही तु्म्हाला सांगू शकत नाही, पण संशोधनाच्या आधारे आम्ही तुम्हाला हे सांगू शकतो की ते संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करावं.
 
नुकसान टाळणं हा लोकांना उत्तेजन देणारा महत्त्वाचा घटक आहे असं संशोधनातून दिसून आलं आहे. म्हणजेच नव्या गोष्टी मिळवण्यापेक्षाही झालेलं नुकसान भरून काढण्याकडे आपला कल असतो.
 
आपली एखादी गेलेली गोष्ट, मग तो मागे पडलेला छंद असो किंवा आरोग्य असो, परत मिळवणं याप्रकारचा संकल्प तुम्ही केलात तर तो टिकण्याची शक्यता जास्त असते असं दिसून येतं.
 
आणि याबरोबरच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे संकल्प व्यवहार्य असू द्या.
 
इतर लोकांना सहभागी करून घ्या
वॉरविक विद्यापीठातले तत्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. जॉन मायकल यांनी संकल्प करण्यात आणि टिकवण्यात सामाजिक घटकांचा असलेल्या प्रभावाचा अभ्यास केला आहे.
 
"आपण केलेले संकल्प इतरांसाठीही महत्त्वाचे आहेत हे लक्षात आलं आणि आपण संकल्प मोडला तर 'इतरांचं नुकसान होईल' ही जाणीव जर झाली तर आपण आपले संकल्प नीट पाळतो," असं मायकल म्हणतात.
म्हणजेच मित्रासमेवत जर तुम्ही एखाद्या क्लासला जाणार असाल तर ते जास्त उपयुक्त ठरू शकतं. जर त्यासाठीची संपूर्ण फी भरलेली असेल तर आपण वेळ आणि पैशाची गुंतवणूक केल्याची भावना असते. त्यामुळे केलेला संकल्प आपण पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करतो.
 
आपण आपल्यापेक्षा इतरांना होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिक धडपडत असतो का, या संकल्पनेवर मयकल सध्या काम करत आहेत.
 
प्रतिष्ठा
प्रतिष्ठा ही सुद्धा मोठी प्रेरणा असते. त्यामुळे आपला संकल्प लोकांसमोर जाहीर करणे सुद्धा फायद्याच ठरतं. आपण जर आपला संकल्प पाळला नाही तर लोक आपल्याबद्दल वाईट बोलतील, या भावनेतून आपण संकल्प पूर्ण करण्यासाठी धडपडतो. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डमधले प्रा. नील नेव्ही म्हणतात, "आपली प्रतिष्ठा अविश्वासू बनू नये अशी आपली इच्छा असते. त्यामुळे आपले संकल्प आणि नियोजन जाहीर करणे फायद्याचे ठरते. पैज लावणे हे सुद्धा काही वेळा फायद्याचे ठरते." संकल्प सविस्तर स्वरूपाचे असणे सुद्धा आवश्यक आहे, असं ते म्हणतात.
 
म्हणजेच मी मंगळवारी दुपारी आणि शनिवारी सकाळी जीमला जाईन, हा संकल्प मी जीमला जाणार या त्रोटक संकल्पापेक्षा उपयुक्त ठरतो, असं ते म्हणतात. अंमलबजावणीचा उद्देशही असावा लागतो, असही ते सांगतात. म्हणजेच जर तुम्हाला भाषा शिकायची असेल तर प्रवासात असताना भाषेच्या संदर्भातले पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता. उद्या कोणतं पॉडकास्ट ऐकायचं याचे स्मरण होण्यासाठी तशी चिट्टी तुम्ही तुमच्या कारच्या स्टीअरिंगला लावून ठेऊ शकता, असं ते म्हणतात. निव्वळ संकल्प करण्यापेक्षा त्याची पूर्तता करण्याचे टप्पेसुद्धा ठरवावे लागतात, प्रा. नील नेव्ही यांना वाटतं.
 
पण काही वेळा आपण घेतलेले निर्णय हे उदाहरण बनतात, असं ते सांगतात. काही वेळा अपवाद होऊ शकतो, हे आपणाला मान्य करावं लागेत. म्हणजे जर घराला आग लागली असेल तर आपण जीमला जाऊ शकत नाही, हे सहाजिकच आहे. पण अपवादाचा परीघ वाढवून चालत नाही. प्रा. नील नेव्ही म्हणतात, वाढदिवस हे जीम चुकवण्याचे कारण असू शकतं, कारण वाढदिवस वर्षातून एकदाच येतो. पण आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे, आज थंडी जास्तच आहे, अशी कारणे सांगू नयेत. असं झालं तर प्रत्येक गोष्ट अपवाद ठरू लागते, असं ते म्हणतात.
 
दीर्घकालीन नियोजनाचा भाग
ऑस्ट्रेलियातल्या जेम्स कूक युनिव्हर्सिटीमधले मानसशास्त्रज्ञ अॅड. अॅन स्विनबोर्न म्हणतात, संकल्प सिद्धीपर्यंत नेण्यासाठी तो आपल्या दीर्घकालीन नियोजनाचा भाग होणं आवश्यक असतं. निव्वळ भावनिक आणि अस्पष्ट अशा संकल्पांचा फायदा होत नाही, असं त्या म्हणतात.
 
समजा तुम्हाला खेळात कधीच रस नसेल आणि तुम्ही जर खेळाडू होण्याचा निर्णय घेतला तर ते पूर्ण होणं कठीण असतं. वयाची पन्नाशी पूर्ण होण्यापूर्वी जग फिरायचं असा जर तुम्ही निश्चय केला असेल तर पैसे वाचवण्याचा तुमचा संकल्प पूर्ण होऊ शकतो. संकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन आवश्यक असतं, असं त्या म्हणतात.

सकारात्मक आणि नकारात्मक भावनांची निर्मितीसुद्धा संकल्प सिद्धीला नेण्यासाठी आवश्यक असते, असं त्या सांगतात. उदाहरणात तुम्ही जर दारू सोडायचा निर्णय घेतला असेल तर मित्रांना भेटण्यासाठी कॉफी शॉपमध्ये जाणं आवश्यक आहे. निव्वळ मनाच्या शक्तीवर अवलंबून राहून चालत नाही, तर संकप्ल पूर्ण करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजनही करावं लागतं, असं त्या म्हणतात.
 
Published By- Priya Dixit