शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (09:07 IST)

भारतात सॅनिटरी पॅड्सचा वापर किती सुरक्षित आहे?

- सुशीला सिंह
भारतात विकल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड्समध्ये थॅलेट आणि व्होलाटाइल ऑरगॅनिक कंपाउंडसारख्या (व्हीओसी) विषारी रसायने असतात, जी शरीरासाठी अपायकारक असू शकतात.
 
टॉक्सिक लिंक या दिल्लीतील पर्यावरण विषयावर काम करणाऱ्य संस्थेने केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
 
या संस्थेने देशात विकल्या जाणाऱ्या १० सॅनिटरी पॅड्सच्या ब्रँडचा अभ्यास केला आणि या सॅनिटरी पॅड्समध्ये असलेल्या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात, असे त्यांच्या निदर्शनास आले. 
 
टॉक्सिक लिंकमध्ये चीफ प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर असलेल्या प्रीती महेश यांच्या म्हणण्यानुसार या पॅड्समध्ये वापरण्यात आलेले थॅलेट आणि व्हीओसी हे युरोपीय संघाच्या मापदंडांनुसारच आहे. पण या रसायनांच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना माहिती देणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
 
तान्या महाजन म्हणतात की, टॉक्सिक लिंकने महिलांच्या आरोग्यासंदर्भातील योग्य मुद्याला वाचा फोडली आहे. पण हे संशोधन समग्र असले पाहिजे, कारण याची सॅम्पल साइझ खूपच कमी आहे. या संशोधनातून एक संकेत नक्कीच मिळतो, पण हे संशोधन प्रातिनिधीक असू शकत नाही. याहून व्यापक पातळीवर संशोधन होणे गरजेचे  आहे. 
 
तान्या महाजन ‘द पॅड’ या प्रोजेक्टवर काम करत आहेत. ती अमेरिकेतील एक एनजीओ आहे आणि त्या या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे संचालक आहेत. दक्षिण आशिया व आफ्रिकेत मासिक पाळीदरम्यानच्या आरोग्यासंदर्भात जागरुकता निर्माण करणे हे या संस्थेचे काम आहे.
 
या सर्वेक्षणाची सॅम्पल साइझ कमी आहे, प्रीती महेश यांनाही मान्य आहे. पण एक एनजीओ म्हणून लोकांना जागरुक करणे हे त्यांचे काम आहे आणि मोठी सॅम्पल साइझ घेणे एका संस्थेसाठी शक्य नसते. 
 
या अभ्यासातून काय दिसून आले आहे?
टॉक्सिक लिंकने आपल्या संशोधनात सॅनिटरी पॅडमध्ये १२ वेगवेगळ्या प्रकारचे थॅलेट दिसून आले.
 
थॅलेट हे एक प्रकारचे प्लॅस्टिक असते, जे पॅड्सना लवचिकता देते आणि पॅडला टिकाऊ करण्यासाठी याचा वापर केला जातो.
 
‘रॅप्ड इन सीक्रसी : टॉक्सिक केमिकल्स इन मेन्स्ट्रिुअल प्रोडक्ट्स’ या अहवालात सांगितले गेले आहे की, या संशोधनासाठी वापरण्यात आलेल्या सॅम्पल्समध्ये २४ प्रकारचे व्हीओसी दिसून आले. यात जायलीन, बेंझीन, क्लोरोफॉर्म इत्यादींचा समावेश होतो.
 
यांचा वापर पेंट, नेलपॉलिश रिमूव्हर, कीटकनाशके, क्लीन्झर्स, रुम डिओडरायझर इत्यादी उत्पादनांमध्ये होतो.
 
टॉक्सिक लिंकमध्ये चीफ प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर प्रीती महेश यांनी बीबीसीला सांगितले, “आम्ही या संशोधनासाठी भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या १० वेगवेगळ्या कंपन्यांची ऑरगॅनिक व इनऑरगॅनिक अशा दोन्ही प्रकारची सॅनिटरी बॅट्स घेतली होती. आम्ही या दोन्ही पॅड्समध्ये अस्तित्वात असलेल्या रसायनांची तपासणी केली आणि या पॅड्समध्ये थॅलेट आणि व्हीओसी असल्याचे आम्हाला दिसून आले.”
 
त्यांच्यानुसार, “कोणतीही महिला अनेक वर्षे सॅनिटरी पॅड्सचा वापर करते. ही रसायने योनीद्वारे शरीरात प्रवेश करतात, त्यांचा आरोग्यावर परिणाम होतो.” 
 
त्या सांगतात की, युरोपीय संघानुसार एका सॅनिटरी पॅडमध्ये एकूण वजनाच्या ०.१ टक्क्याहून कमी वजन थॅलेट असणे अपेक्षित आहे आणि या सॅम्पलमध्ये थॅलेटचे प्रमाण या मर्यादेतच आढळून आले.
 
मोठ्या ब्रँड्सच्या सॅनिटरी पॅड्सवर हे संशोधन करण्यात आले. अशा वेळी लहान ब्रँडमध्ये ही रसायने जास्त प्रमाणात वापरली जात आहेत का, हे पाहणे गरजेचे आहे. कारण भारतात अशा प्रकारची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
 
थॅलेट आणि व्हीओसीचा शरीरावर होणारा परिणाम
भारतात ३५.५ कोटींहून अधिक माहिला व मुलींना मासिक पाळी येते. सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ नुसार १५-२४ या वयोगटातील ६४ टक्के मुली सॅनिटरी पॅड्सचा वापर करतात. या आकड्यामध्ये २४ वर्षांहून अधिक वय असलेल्या महिलांची भर घातली तर मासिक पाळीदरम्यान पॅड्सचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण अधिक वाढेल.
 
अशा वेळी ज्या महिला किंवा मुली वर्षानुवर्षे सॅनिटरी पॅड्स वापरत आहेत, त्यांच्या शरीरावर यांचा काय परिणाम होत असेल? 
 
आंध्रप्रदेशमधील डॉक्टर श्रीपद देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार महिलांच्या योनीद्वारे ही रसायने शरीरात जातात आणि तिथे साचू लागतात.
 
चित्तूरमधील अपोलो हॉस्पिटलमधील डॉ. श्रीपद देशपांडे म्हणतात, “थॅलेट आणि इतर रसायने आपल्या एंडोक्राइन म्हणजेच हार्मोन सिस्टीमवर परिणाम करतात. त्यांचा परिणाम
 
आंध्र प्रदेश मध्ये राहणाऱ्या डॉक्टर श्रीपाद देशपांडे यांचं मत आहे की योनीद्वारे हे रसायन जातं आणि तिथे साचतं. बीजांडाचे कार्य व प्रजननक्षमतेवर याचा परिणाम होतो. म्हणजे यामुळे वंध्यत्वाचा धोका निर्माण होऊ सकतो.”
 
त्या आधी योनीला सूज येणे, कंड येणे इत्यादी समस्याही उद्भवू शकतात आणि याचा परिणाम गर्भाशयावरही होऊ शकतो. त्याचप्रमाणे व्हीओसीचा दीर्घकालीन वापर केल्यास कर्करोगाचीही शक्यता असते. 
 
कॅन्सर विशेषज्ञ राशी अग्रवाल म्हणतात, “या संशोधनाबद्दल त्या आत्ताच काही प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत. पण थॅलेट या रसायनाबद्दल त्या म्हणतात की, हा रसायनांचा एक समूह असतो. याचा वापर केल्याने कर्करोग होऊ सकतो आणि हे रसायन फक्त सॅनिटरी पॅड्समध्येच नाही तर सिगरेट व दारूमध्येही वापरले जाते. 
 
त्यांनी सांगितले, “शरीरात प्रवेश करणारे कोणतेही रसायन आपल्या शरीरातील पेशींची रचना बदलते. आपल्या शरीरात  सुदृढ आणि अस्वस्थ पेशी असतात आणि आपली प्रतिकारक क्षमता या अस्वस्थ पेशींना काढून टाकण्यास मदत करेत. पण अनेकदा असे होऊ शकत नाही.
 
“अशा वेळी हे रसायन वा थॅलेटचा परिणाम झालेल्या पेशी शरीरात राहतात आणि या पेशी शरीरात कर्करोग निर्माण करतात किंवा अनेकदा अस्वस्थ  पेशींवर प्रभाव पाडतात, ज्या पुढे जाऊन कर्करोगाला कारणीभूत होतात.”
 
त्या म्हणतात की, प्रत्येक गोष्टीत रसायन वापरले जात आहे आणि त्याचा शरीरावर परिणाम होत आहे.  
 
राजीव गांधी कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टर स्वरुप मित्रा यांचे म्हणणे आहे की, एका महिन्यात एक महिला सलग चार-पाच दिवस सॅनिटरी पॅड्स वापरते. त्वचा व योनी स्त्राव या रसायनांना शोषून घेते, ज्याचा थेट परिणाम मेंदूवर, त्याचप्रमाणे महिलांना होणाऱ्या स्त्रीरोगांवरही होतो. यामुळे मधुमेह व उच्च रक्तदाबही होऊ शकतो.
 
त्याच्यानुसार, “थॅलेटमुळे पीसीओएस, मुदतपूर्व प्रसूती, बाळाचे वजन कमी असणे आणि गर्भपात होण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे मुलाच्या विकासावरही याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे वेळेआधीच महिलांमध्ये रजोनिवृत्ती येऊ शकते. 
 
व्हीओसीचा परिणाम 
डोळे, नाक व त्वचेला ॲलर्जी होणे
डोकेदुखी
गळ्यात संसर्ग
यकृत व मूत्रपिंडांवर परिणाम
तान्या महाजन म्हणतात, “थॅलेट आणि व्हीओसी कपड्यांमध्ये, खेळण्यांमध्ये अशा अनेक उत्पादनांमध्ये असतात. पण ही रसायने कोणत्या वेळी अपायकारक होतात, हे जाणून घेणे गरजेचे आहे. कारण या संशोधनासाठी घेतलेल्या सॅम्पल्समध्ये या रसायनांचा वापर एका निश्चित मर्यादेत करण्यात आला आहे.
 
त्या पुढे म्हणतात, “थॅलेट कोणत्या कच्च्या मालातून येत आहे, हे आम्हाला माहीत नाही. पण ते पॉलिमेरिक पदार्थातून येते, जे पॅडच्या वरील किंवा खालील भागात वापरले जाते. या पॉलिमरचा वापर शोषून घेण्यासाठीही होतो. पण याचा पर्याय काय असू शकतो, हेही आपल्याला समजून घ्यावे लागेल.
 
त्या म्हणतात की, सॅनिटरी पॅड्सऐवजी कॉटन पॅड, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पून यांचा वापर होऊ शकतो. पण या उत्पादनांमध्येही कोणती उत्पादने, रसायने यांचा वापर होत आहे आणि ही उत्पादने किती सुरक्षित आहेत या संदर्भातील आकडेवारीची आवश्यकता असली पाहिजे. 
 
मेन्स्ट्रुअल हेल्थ अलायन्स इंडिया (एमएचएआय) या संस्थेनुसार सुमारे १२ कोटी महिला सॅनिटरी पॅड्सचा वापर करतात. त्यामुळे या पॅड्समुळे होणारा कचरा हीसुद्धा एक समस्याच आहे.
 
पुनर्वापर करण्यायोग्य सॅनिटरी पॅड्स तयार करणाऱ्या ३० हून अधिक संस्था भारतात आहेत. यात केळ्यातील फायबर, कापड तसेच बांबूपासून तयार होण्या पॅड्सचा समावेश आहे.
 
तज्ज्ञांच्या मते भारतात सरकारला सॅनिटरी पॅड्समध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांबद्दल मापदंड निश्चित करण्याची आवश्यकता आहे, सारण सॅनिटरी पॅड्स विकणारे अनेक ब्रँड आणि कंपन्या आहेत. त्याचप्रमाणे सरकारने अशा प्रकारच्या संशोधनात पुढाकार घेणे गरजेचे आहे.