गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By Author रूपाली बर्वे|
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (13:02 IST)

Period Leave मासिक पाळी रजा 'मजा किंवा सजा' म्हणून नको

टीव्हीत सॅनिटरी पॅडची जाहिरात बघून महिला सोडून कोणीही असे म्हणू शकतं की मासिक पाळी स्त्रीसाठी काही अडथळा नाही, हे दिवस तिच्यासाठी सामान्य दिवसांसारखे असावे. पण जाहिरात बघाताना हा विचार केला जात नाही की ते केवळ स्टेन बद्दल निष्काळजीपणे वावरता येईल असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्या दरम्यान होणार्‍या वेदनांबद्दल नव्हे.
 
अलीकडेच महिलांना मासिक पाळी रजेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. तर देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये महिलांना मासिक पाळीदरम्यान सुटी देण्याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. दरम्यान महिला आणि मुलींना मासिक पाळीदरम्यान सुटी देण्याचे विधेयक सरकार आणणार असल्याची चर्चा देखील होती. मात्र आता केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. मासिक पाळीच्या सुट्ट्यांबाबत विधेयक आणण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी असा कोणताही प्रस्ताव मंत्रालयात विचाराधीन नसल्याचे सांगितले.
 
भारतात दररोज अनेक महिला कामासाठी बाहेर पडतात. मासिक पाळीच्या दरम्यान जवळपास 75 हून अधिक टक्के महिला हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जातात. आजही या त्रासाबद्दल पुरुष सहकाऱ्यांशी किंवा बॉसशी बोलणे महिलांसाठी तितके सोपे नाही.
 
पूर्वी या दिवसांत महिलांना विश्रांती दिली जात होती, त्यांना काम करण्यापासून परावृत्त केल जायचे आणि दरम्यान कोणी त्या स्त्रीला स्पर्श देखील करत नव्हतं. तेव्हा स्त्रीला वेगळ्या खोलीत किंवा एका कोपर्‍यात राहण्यास सांगायचे तसेच देवघरात आणि स्वयंपाकघरात तिची सावली देखील पडू नये अशी ताकीद असायची. शास्त्रीय कारण सोडले तर यामागील वैज्ञानिक कारण हेच होते की मासिक पाळीच्या काळात महिलांना अशक्तपणा जाणवतो तसेच महिलांना या दरम्यान संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच मासिक पाळीच्या काळात महिलांना विश्रांतीची नितांत गरज असते.
 
वैज्ञानिक तर्क तर हे देखील दिलं जातं की मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातून एक विशेष प्रकारची लहरी बाहेर पडते. जे इतर लोकांसाठी हानिकारक असून त्यांपासून संसर्ग पसरण्याची भीती असते. म्हणूनच इतर लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी या दिवसांमध्ये महिलांना वेगळे ठेवण्याची प्रथा सुरू झाली. पूर्वी स्त्रिया शारीरिक मेहनत अधिक घेत असत आणि प्राचीन काळी डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्स आणि इतर सोय नव्हती. भारतात मासिक पाळीशी संबंधित अनेक संशोधने झाली आहेत आणि विश्वास बसत नसला तरी भारतातील मासिक पाळी असलेल्या 70% पेक्षा जास्त मुली आणि स्त्रिया आज देखील जुने कपडे वापरतात, ज्यांचा वारंवार वापर केला जातो. याव्यतिरिक्त भारतातील 80% हून अधिक स्त्रिया कधी-कधी शोषण्यासाठी राख, वर्तमानपत्रे, वाळलेली पाने आणि भूसी वाळू वापरतात.
अभ्यासातून काय कळतं?
पीरियड या कालावधीत शरीर गर्भाशयाचे आकुंचन घडवून आणणारे संप्रेरक तयार करतं ज्यामुळे गर्भाशयाचे अस्तर बाहेर पडण्यास मदत होते. हे आकुंचन मेंस्ट्रुअल क्रैम्प रुपात जाणवतं. सामान्य ओटीपोटात दुखण्याव्यतिरिक्त, कधीकधी पाय दुखणे आणि पाठदुखी अशी समस्या देखील होते. या वेदना सामान्यतः मासिक पाळी सुरू झाल्यानंतर एक किंवा दोन दिवस होतात आणि वयानुसार कमी देखील होतात. तर काही महिलांना वेदना मासिक पाळीच्या सुरुवातीपर्यंत मर्यादित नसून संपूर्ण चक्रभर असतात. दरम्यान जास्त रक्तस्त्राव किंवा अधिक दिवस पाळी सुरुच राहते. अशात स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घेण्याची गरज देखील पडते.
 
अभ्यासातून असे दिसून येते की मासिक पाळी अजूनही स्त्रियांना शिक्षण आणि कामाच्या संधींमध्ये प्रवेश मर्यादित करते. 
 
तर अलीकडेच केरळमध्ये एक उपक्रम राबवण्यात आला ज्यात जनजागृती या दृष्टिकोनातून एर्नाकुलम मधील एक शाळा आणि मॉलमध्ये मासिक पाळीच्या वेदना चेतवणारं यंत्र लावण्यात आलं. हे तंत्र Cup of life या प्रकल्पाचा भाग असून सँड्रा सनी यांनी #feelthepain हा उपक्रम सुरू केला. जेव्हा कॉलेजमध्ये काही मुलांना हे यंत्र लावण्यात आलं तेव्हा त्यांनी ओरडायला सुरुवात केली आणि त्यांना त्या वेदना अजिबात सहन झाल्या नाहीत. मात्र बायकांना काहीही फरक पडला नाही कारण त्या वर्षानुवर्षं या वेदना सहन करत आहेत.
 
उज्जैन येथील आर डी गार्डी मेडिकल कॉलेजच्या कम्युनिटी मेडिसिन प्रोफेसर डॉ. कीर्ती देशपांडे यांच्यामते पीरियड्स ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे आणि काही वेदना प्रत्येकाला जाणवतात परंतु काही स्त्रियांना या काळत जास्त समस्यांना सामोरे जावं लागतं जसे की तीव्र पोट किंवा पाठदुखी, जास्त रक्तस्त्राव किंवा अनियमित मासिक पाळी. अशात योग्य वैद्यकीय सल्ल्याने उपचार घेऊन आराम मिळू शकतो. सामान्यतः या कालावधीत रजेची आवश्यक नसते परंतु ज्यांना जास्त त्रास होतो त्यांना ही सुविधा मिळायला हवी.
 
भारतात काय स्थिती ? 
60 टक्क्यांहून अधिक आशियाई देशांमध्ये महिलांना पेड पीरियड लीव्ह दिली जाते. भारतात मासिक पाळीच्या रजेबाबत वेगळा कायदा नाही. बिहार हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे 2 जानेवारी 1992 पासून महिला कर्मचाऱ्यांना 2 दिवसांची रजा दिली जात आहे. याची सुरुवात लालूप्रसाद सरकारने केली होती. यानंतर 1997 मध्ये मुंबई स्थित कल्चर मशीनने 1 दिवसाची सुट्टी देण्यास सुरुवात केली. 2020 मध्ये फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने रजा देण्याची घोषणा केली.
 
आता भारतातील काही कंपन्यांमध्ये या कालावधीत 2 दिवस रजेची तरतूद आहे. यामध्ये ऑनलाइन स्विगी, बायजू, मातृभूमि, मॅग्जटर, वेट एंड ड्राय, जयपुरकुर्ती.कॉम इंडस्ट्री ARC, फाल्यमायबिझ, हॉर्सेज स्टेबल न्यूज, जयपुरकुर्ती.कॉम आणि गोजूप ऑनलाइन यांचा समावेश आहे. तर केरळमधील एका विद्यापीठाने विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान सुटी देण्याबाबत नियम लागू केले आहेत. कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. येथे प्रत्येक सेमिस्टरमध्ये विद्यार्थिनींना उपस्थितीत 2% सूट दिली जाते.
 
पीरियड लीव्ह देणारा जपान पहिला देश
महिलांना मासिक पाळीचा काळ त्यांच्यासाठी वेदनादायक असल्याचे लक्षात घेत दुसऱ्या महायुद्धानंतर 1947 मध्ये जपानने नवीन कामगार कायद्यात पीरियड्स लीव्हचा समावेश केला. 1922 मध्ये सोव्हिएत युनियनने यासाठी राष्ट्रीय धोरण तयार केले होते आणि तेव्हापासून काही क्षेत्रांमध्ये या कालावधीत रजा दिली जात होती. तर 1948 मध्ये इंडोनेशियामध्ये याची सुरुवात झाली. यानंतर अनेक देशांनी महिलांच्या वेदना समजून सुटी देण्याची तरतूद केली. आज ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया, तैवान, इंग्लंड, दक्षिण कोरिया असे देश मासिक पाळीसाठी सुटी देत ​​आहेत. तर स्कॉटलंडमध्ये तर पीरियड्सशी संबंधित सर्व वस्तू देशात मोफत उपलब्ध केल्या गेल्या आहेत.

 
काय म्हणात महिला ? 
पुण्यात आयटी कंपनीत काम करणार्‍या स्वरा सांगतात की त्यांना या काळात खूप वेदना जाणवतात. अशात ऑफिसला जाणे शक्य नसल्यामुळे आधी कितीतरी वेळा रजा टाकवी लागायची मात्र आता वर्क फ्रॉम होम ची सुविधा असल्यामुळे घरुन काम करणं जरा सोयीचं वाटतं.
 
मुंबईत डांस क्लासेस घेणार्‍या मंजुषा सांगतात की पीरियड्स दरम्यान क्लासला येणार्‍या मुली तर सुट्टी घेऊन घेतात पण आपण चार दिवस क्लास बंद ठेवणे शक्य नाही. अशात किमान दोन दिवस तरी साधारण स्टेप्स शिकवून किंवा आधी शिकवल्याच्या प्रॅक्टिसवर भर दिला जातो. कारण यासाठी दोन दिवस वाया घालवणे परवडणे शक्य नाही.
 
सतत व्यावसायिक प्रवास करत असणार्‍या नेहा यांच्याप्रमाणे त्या महिलांसाठी पीरियड लीव्हची खरोखर गरज आहे ज्यांना असह्य वेदना जाणवतात. तसेच आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने पीरियड्स दरम्यान प्रवास करणे खूप अवघड असतं.
 
पीरियड लीव्हवर चर्चा
अशात अनिवार्य पीरियड लीव्ह या चर्चेने पेट घेतला असला तरी यावर कामाच्या ठिकाणी स्त्री-पुरुष समानतेची चर्चाही सुरू झाली आहे. महिलांचा वेदना समजून पीरियड लीव्ह देण्यास सुरुवात जरी केली तरी हे ठरवणे कठिण आहे की याची प्रत्येक महिलेला खरोखर गरज आहे वा नाही. अनेक पुरुष मासिक पाळीच्या रजेच्या संकल्पनेला भेदभाव म्हणत विरोध देखील दर्शवत आहे. पीरियड लीव्ह पॉलिसीबद्दल बोलत असताना स्त्रिया त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करून काम टाळण्यासाठी रजेचा दुरुपयोग कसा करू शकतात यावर जोरदार युक्तिवाद केला जात आहे.
 
भारत सारख्या देशात यावर चर्चा होणे संकुचित मानसिकतेतून बाहेर पडण्याचे संकेत समजावे. परिणाम काहीही असो पण याने स्त्रिया देखील मुखर होऊन बाहेर पडतील आणि आपल्या गरजांसाठी आवाज उचलतील. स्वत:ला आधुनिक आणि स्वतंत्र म्हणवून घेणारे देखील या विषयावर घरात बोलणे टाळतात. अशात हा विषय सर्वांसमोर मांडणं गरजेचं आहे कारण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. याला समाजाने धर्म, रुढी, परंपरा यांच्याशी जोडत स्त्रीला विटाळ म्हणून अस्पृश्य ठरवलं. तिच्यावर नियम लादले गेले जे ती आज देखील सोसत आहे. पण हे विसरुन कसे चालेल की मातृत्वाचे वरदान स्त्रीला यामुळेच मिळाले आहे.
 
काही लोक यासाठी लढा देत असले तरी आजही स्त्रिया कमजोर असून त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात या समजुतीतून त्यांना विविध क्षेत्रात नाकारलं जातंय. स्त्रियांना बाळंतपणात मिळणारी रजा आणि आता त्यात जर मासिक पाळी पगारी रजेची भर पडली तर महिलांना नोकरीत नाकारण्याचे प्रमाण तर वाढणार नाही याची एक भीती देखील निर्माण होत आहे. मासिक पाळी रजेमुळे समानतेची मागणी करणारी स्त्री आपल्या सारखे आव्हान पेलू शकत नाही, पुरुषांमध्ये अशी भावना निर्मित होऊ शकते. कारण दर महिन्यात मिळणार्‍या या रजेचा ऑफिससंबंधी इतर कामांवर परिणाम होऊ शकतो.
 
असो मासिक पाळीच्या वेदनांबद्दल पुरुषांना त्यांच्या स्वत: च्या समजासह सोडून स्त्रियांना काय हवं यावर लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. या संवेदनशील आव्हानांबद्दल लोकांना शिक्षित करणे आवश्यक आहे. रजेवर चर्चा करण्याआधी देशात महिलांसाठी स्वच्छतागृहाची उपलब्धता, जागोजागी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन लावणे, याबद्दल जागरूकता निर्माण करणे, सुरक्षा व आरोग्यावर उघडपणे चर्चा व्हायला हवी. महिलांसाठी अधिक सक्षम वातावरण निर्माण करण्यावर प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे.