आपल्या देवघराला बनवा आकर्षक
घरातील अत्यंत शांतीदायक व स्फूर्तिदायक जागा म्हणजे देवघर. घराच्या सजावटीबरोबरच देव्हार्याची सजावटही तितकीच महत्त्वाची असते. अनेक गोष्टींमुळे येणारा ताण हा देव्हार्यातील प्रसन्नतेमुळे नाहीसा होतो. तसेच यामुळे घरात सुख, शांती आणि मसृद्धी टिकते. देव्हारा सजविण्यासाठी काही टिप्स...
देव्हार्याच्या मागील भिंत वॉलपेपर लावून सजवा. फ्रॉस्टेड किंवा स्टेन ग्लास लावून आतून एलइडी स्ट्रीप फिरवल्यास सुंदर लूक येतो. आजकाल एम.डी.एफ. किंवा पीव्हीसीचे सुंदर पॅनेल्स बाजारात मिळतात. ते मागील भिंतीवर किंवा दोन्ही बाजूला लावून त्यामधून लाईट इफेक्ट्स देऊ शकता.
फॅब्रिक किंवा पैठणीसारख्या साडीचा पदर वापरुन देव्हार्यामागे छान बॅकग्राउंड करू शकता. तुमच्या कुलदैवताचा किंवा ज्याच्यावर तुची श्रद्धा आहे त्यांचा फोटो या भिंतीवर लावून मंदिरासारखे पवित्र वातावरण निर्माण करता येते. देव्हार्याच्या दोन्ही बाजूस दोन समया लावल्यास सुंदर आणि पारंपरिक लूक येईल. देवघर हे पूर्व-पश्चिम असते. देवघरात एका कोपर्यात एक छोटेसे बेसिन बसवावे. पाण्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. दारामागे एक हूक किंवा टाय रॉड लावून घेतल्यास देवाची वस्त्रे वाळविण्याची सोय होईल. देवघरासाठी स्वतंत्र खोली नसेल तर डायनिंग रूम किंवा गेस्टरूमध्ये बैठे किंवा भिंतीवर देवघर बनवता येते. तेही शक्य नसेल तर स्वयंपाकघरात ओट्या शेजारी किंवा ओट्यावरील शेल्फसमध्ये देवघर बनवता येते.