भय्यासाहेब फार मोठे सामाजिक कार्यकर्ता होते. दैवाने त्यांना दिलेल्या गडगंज संपत्तीतून ते नेहमी गोरगरिबांची मदत करायचे. दीन दुःखी कष्टाळूजनांकडे ते नेहमी सहानुभूतीच्या नजरेने पाहायचे. एकदा त्यांच्या कार्यकर्तांनी वीस वर्षाच्या रखमा नावाच्या तरुण मुलीला त्यांच्यासमोर आणले. गावामधून वाहणार्या नदीला आलेल्या पुरामध्ये त्या मुलीचे आई, वडील, घर-दार सर्वच वाहून गेले होते.
गरीबाचे कनवाळू भय्यासाहेब त्या मुलीची काही मदत करतील या अपेक्षेनेच कार्यकर्ते तिला त्यांच्याकडे घेऊन आले होते. गावामध्ये आलेल्या भीषण आपदांमध्ये सर्वच गमावून बसलेल्या व दोन वेळच्या जेवणाला ही लाचार झालेल्या निराश्रित रखमाने भय्यासाहेबांकडे अपेक्षेने पाहिले व ती अक्षरशः त्यांच्या पायावर जाऊन पडली. पण मदतीच्या अपेक्षेने भय्यासाहेबांच्या पायात पडलेल्या रखमाला लक्षात आलं, की भय्यासाहेबांची नजर तिच्या सरकलेल्या पदरावर पडली आहे आणि ते एकटक तिकडेच पाहताहेत.