ganesh chaturthi

स्वभाव पदार्थांचे

Updated: गुरूवार, 21 एप्रिल 2022 (13:26 IST)
 
उप्पीट नि पोहे हे "सामान्य जनता" या वर्गात मोडणारे.म्हणजे अगदी सहनशील! यांच्या वाट्याला कधी कौतुकही येत नाही नि कधी टीकाही येत नाही. ही जोडी लहान, थोर, आजारी आणि सगळ्या भारतवर्षाला चालणारी. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, यांपैकी कोणताही प्रहर यांना वर्ज्य नाही. पैशाची मुजोरी या द्वयींना नसल्याने गरीबांपासून श्रीमंतांच्या मुखात हे तितक्याच आनंदाने रमतात.

गोडाचा शिरा मात्र जरा खास व्यक्तीमत्त्व...खास प्रसंगांना उपस्थित राहणारं! सत्यनारायणाचा प्रसाद होण्यासारखं भाग्य वाट्याला आल्यानं हा शिरा अगदी "नशीबवान".. महाराष्ट्रात हे रव्याचं लेकरू शिरा म्हणून जन्मलेलं तर उत्तरेकडील कणकेचं बाळ "कडा प्रशाद" नावाचं. तर कुठे "सुजी हलवा" नावानं मिरवणारं.. बाळंतिणीच्या खाद्यविश्वातही अधिकारानं शिरलेला हा "शिरा".
 
वडा, भजी हे पदार्थांमधले हिरो. लोकप्रिय...पोट भरलेल्यालाही स्वत:कडे आकर्षित करणारे. हे दिसले की लोक यांच्याभोवती जमा नाही झाले तरच नवल! पावाशी लगीनगाठ बांधून पावाचं नशीब उजळवलं ते याच द्वयींनी!

पावावरून आठवण आली ती पावभाजीची. सगळ्यांना सामावून घेणारा हिचा स्वभाव! बटाटा, कांदा, ढबू मिरची, वाटाणा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण, फ्लॉवरसारख्या सगळ्या भाज्या, सगळे मसाले, तेल, लोणी यांना एकत्र कुटुंबात गुण्या-गोविंदाने नांदवून आपला स्वत:चा चवीचा ठसा उमटवणारी खाद्यविश्वात नाकामागून येऊन तिखट झालेली ही खाद्यसुंदरी!

गोड माणसांची दुनियाही अशीच रंगरसीली! प्राचीन काळापासून अख्ख्या भारतवर्षाची लेक म्हणजे क्षीर ऊर्फ खीर! अगदी सोज्ज्वळ पण विविध पोषाखांची आवड असणारी. कुठे शेवया, कुठे गव्हले, कधी तांदुळाच्या रूपाने पायसम् झालेली तर कधी गव्हाळ वर्णी हुग्गीचं रूप ल्यालेली! शुभकार्य असो की दिवसकार्य ही हजेरी लावणारच... " मी खीर खाल्ली असेल तर बुड घागरी" म्हणत बालपणीच परिचीत झालेली ही फारशी आवडतही नाही नि नावडतही नाही. पण नसली तर मात्रं नाडवते.
 
लाडू हा चराचरातून तयार होणारा. तूप आणि साखर हे याचे प्रमुख कुटुंबीय. हे कुटुंबीय भाजलेल्या बेसनात घालून जन्मणारा बेसन लाडू हा टाळ्याला चिकटून फजिती करणारा. बुंदीचा लाडू शुभकार्यात भाव खाऊन जाणारा.  रव्याचा लाडू आपला असाच नारळ घरात आला तर जन्मणारा नि लक्षात येण्याआधी संपून जाणारा.. साध्या पोळीपासून ते राजेशाही डिंकापर्यंत कोणत्याही रूपात सादर होण्याची किमया लाडूच करू जाणे! हा बच्चेकंपनीचा लाडका!

पुरणपोळी ही पक्वानांची राणी! नाजुक-साजुक स्वभावाची.. महाराष्ट्राची नि कर्नाटकाची ही कन्या  प्रत्येक सणाची अगदी लाडकी. पण हिच्याशी वागताना थोडी जरी चूक झाली तरी  हिचा पापड मोडलाच म्हणून समजा!
 
जिलेबी...नटरंगी..पण बिनभरवशाची..कधी आंबट तर कधी गोड..आज कुर्यात असणारी कुरकुरीत पण नाराज होऊन कधी मान टाकेल ते सांगता येत नाही. पण लग्नाच्या पंगतीची हिला भारी हौस..
 
वर्ण काळा असला तरी अंगी गुण असले की सार्याचे आपण लाडके होतो...हे शिकवणारा गुलाबजाम!
 
ओठाला मुरड घालून पोटातला आनंद पोटातच ठेवणारी करंजी!
 
सगळे  गुणीजन भोवताली असताना आणि पटकन सांगता येईल असा एकही गुण अंगी नसताना ज्याच्याशिवाय पान वाढलच जात नाही ते म्हणजे पोळी, भाकरी ...

आत्मविश्वासाचा वारसा घ्यावा तर त्यांच्याकडून..ना रूप, ना रंग, ना ठसा उमटवणारी चव..पण वर्षानुवर्षे त्यांचं महत्त्व अबाधित आहे. भाताची मात्र कथा आगळीच...भात मनमिळावू.भाता तुझा रंग कसा?....
ज्यात मला मिसळाल तसा...वरणात रंगून पिवळाधम्म होणारा, साखरभातात केशरात केशरी होऊन जाणारा, पुलावात रंगीबेरंगी तर दहीभातात पांढराशुभ्र! याला कशाचच वावडं नाही. दहीभात होऊन महादेवाच्या पिंडीवर  विराजमान होतो नि चिकन किंवा मटणाशी दोस्ती करून इफ्तार पार्टीतही शामील होतो..सर्वधर्मसमभाव याच्याकडून शिकावा. चटकदार मसालेभाताच्या रूपात,तिखट बिर्याणीच्या थाटात सादर होणारा भात हा  गोड केशरी साखरभाताच्या रूपातही प्रकट होतो.
 
रूप,रंग,स्थळ ,काळ,वेळ,प्रसंग...कशालाच न जुमानणारा हा भात माणसाला आयुष्याच्या सुरूवातीपासून शेवटापर्यंत आणि त्यांनतरही प्रामाणिक साथ देतो. म्हणूनच दक्षिण भारतात त्याला "अन्न" म्हणतात. अन्न बनून एकट्याने माणसाला संपूर्ण आयुष्यभर पोसायचं सामर्थ्य भातात आहे.
 
म्हणून तर  जन्मापासून सहाव्या महिन्यात भाताच्या पेजेने सुरू होणारी खाद्ययात्रा मेतकूट भात,वरणभात, आमटीभात, मसालेभात, वडाभात, पुलाव, बिर्याणी करत पुन्हा वरणभात, मेतकूटभात, पेज या क्रमाने माघारी येते नि भाताच्या पिंडाने संपते...
 
इहलोकीच्या प्रवासानंतरही वारसदारांनी ठेवलेल्या दहीभाताच्या रूपाने ती अनंतकाळ तशीच सुरू राहते...
 
- सोशल मीडिया

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

पार्लरला जाण्याची गरज नाही! घरच्या घरी करा ५-स्टेप फेशियल, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

सणासुदीत मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडलंय? ‘हे’ घरगुती उपाय देतील झटपट आराम

ही योगासने आणि शितकारी प्राणायाम मेनोपॉजच्या काळात फायदेशीर आहे

Janmashtami Essay 2026 जन्माष्टमी निबंध

अतिशय चवदार आणि चमचमीत भाजी ''कढाई मशरूम'' पराठ्यासोबत अप्रतिम लागते

पुढील लेख
Show comments