गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (13:34 IST)

देवाचे गणित

एकदा दोघेजण एका मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते. अंधार पडू लागला होता आणि ढग जमा होऊ लागले होते. थोड्या वेळाने तेथे आणखी एक माणूस आला आणि तोही त्या दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला. थोड्या वेळाने तो माणूस म्हणाला त्याला खूप भूक लागली आहे, त्या दोघांनाही भूक लागायला लागली होती. 
 
पहिला माणूस म्हणाला माझ्याकडे ३ भाकर्‍या आहेत, दुसरा म्हणाला माझ्याकडे ५ भाकर्‍या आहेत, आपण तिघे मिळून वाटून घेऊ आणि खाऊ. 
 
आता प्रश्न आला कि ८ (३+५) भाकर्‍या तिघांमध्ये कशा वाटायच्या ? पहिल्या माणसाने सुचविले कि प्रत्येक भाकरीचे ३ तुकडे करुया, अर्थात ८ भाकर्‍यांचे २४ (८ x ३) तुकडे होतील आणि आपल्या तिघात ८ - ८ तुकडे समसमान वाटले जातील. बाकी दोघांना त्याचे मत पटले आणि ८ भाकर्‍यांचे २४ तुकडे करुन प्रत्येकाने ८ - ८ तुकडे खाऊन भूक शांत केली आणि मग पावसामुळे मंदिराच्या आवारातच ते सारे झोपी गेले. 
 
सकाळी उठल्यावर तिसर्‍या माणसाने पहिल्या दोघांचेही आभार मानले आणि भाकरीच्या ८ तुकड्यांबद्दल प्रेमाची भेट म्हणून त्या दोघांना ८ सुवर्णमुद्रा देऊन तो आपल्या घरी गेला. 
 
तो गेल्यावर दुसरा माणूस पहिल्या माणसाला म्हणाला की आपण दोघे ४ - ४ मुद्रा वाटून घेऊ. पहिल्या माणसाने याला नकार दिला आणि म्हणाला की माझ्या ३ भाकर्‍या होत्या आणि तुमच्या ५ भाकर्‍या होत्या, म्हणून मी ३ मुद्रा घेईन आणि तुम्ही ५ मुद्रा घेतल्या पाहिजेत. 
 
यावर दोघांची वादावादी चालू झाली. यातून समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते दोघे मंदिराच्या पुजार्‍याकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या सांगितली व ती सोडविण्याची प्रार्थना केली. 
 
हे दोघेही दुसर्‍याला जास्ती देण्यासाठी भांडत आहेत हे पाहून पुजारीपण चक्रावून गेला. त्याने त्या दोघांना सांगितले की या मुद्रा माझ्यापाशी ठेवून जा आणि मला विचार करायला वेळ द्या, मी उद्या सकाळी उत्तर देऊ शकेन. 
 
पुजार्‍याला खरेतर दुसऱ्या माणसाने सांगितलेली ३ - ५ ची वाटणी ठीक वाटत होती, पण तरीसुद्धा तो खोलवर विचार करीत होता. विचार करता करता त्याला गाढ झोप लागली.  
 
थोड्या वेळात त्याच्या स्वप्नात देव प्रगट झाला, तेव्हा पुजार्‍याने देवाला सर्व घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना केली. माझ्या दृष्टीने ३ - ५ अशी वाटणीच उचित आहे असेही त्याने देवाला सांगितले.

देवाने स्मित करुन म्हटले, "नाही, पहिल्या माणसाला १ मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला ७ मुद्रा मिळाल्या पाहिजेत." देवाचे म्हणणे ऐकून पुजारी चकीत झाला आणि त्याने आश्चर्याने विचारले, "प्रभू, असं कसं ?"
 
देव पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला: यात काही शंका नाही की पहिल्या माणसाने आपल्या ३ भाकर्‍यांचे ९ तुकडे केले, परंतु त्या ९ पैकी त्याने फक्त १ वाटला आणि ८ तुकडे स्वतः खाल्ले. म्हणजेच त्याचा त्याग भाकरीचा फक्त १ तुकडा एव्हढाच होता. म्हणून तो फक्त १ मुद्रेचा हक्कदार आहे. दुसऱ्या माणसाने आपल्या ५ भाकर्‍यांचे १५ तुकडे केले, ज्यातले त्याने स्वतः ८ तुकडे खाल्ले आणि ७ तुकडे वाटून दिले. म्हणून न्यायधर्मानुसार तो ७ मुद्रांचा हक्कदार आहे.. हेच माझे गणित आहे आणि हाच माझा न्याय आहे. देवाच्या न्यायाचे हे अचूक विश्लेषण ऐकून पुजारी नतमस्तक झाला. 
 
गोष्टीचे तात्पर्य : आपली परिस्थितीकडे बघण्याची, ती समजण्याची दृष्टी आणि ईश्वराचा दृष्टीकोन हे एकदम भिन्न असतात. आपण ईश्वराची न्यायलीला जाणण्यात, समजण्यात अज्ञानी आहोत. आपण आपल्या त्यागाचे गुणगान करतो, परंतु ईश्वर आपल्या त्यागाची तुलना आपले भोग आणि कर्म याच्याशी करून यथोचित निर्णय घेत असतो. 
 
हे महत्त्वाचे नाही कि आपण किती श्रीमंत आहोत, महत्त्वाचे हे आहे कि आपल्या सेवाभावी कार्यात त्याग किती आहे.