गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (16:28 IST)

लक्ष्याकडे संपूर्ण लक्ष असू दे, तरच यशस्वी व्हाल!

द्रोणाचार्यांनी झाडाच्या फांदीवर बांधलेल्या मातीच्या पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेण्यास सांगून पक्ष्यावर नेम धरल्यावर काय दिसते, असे प्रत्येकाला विचारत द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांना धनुर्विद्येचे (बाण मारण्याचे) शिक्षण देत होते. या विद्येत शिष्य प्रवीण होऊ लागले. द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यासाठीत्यांनी मातीचा एक पक्षी आणला आणि तो एका झाडाच्या फांदीवर बांधला. त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र जमवले.
 
द्रोणाचार्य : झाडावरचा तो पक्षी बघा. बाण मारून त्याच्या डोळ्याचा वेध कोण घेऊ शकेल, ते पाहूया. (युधिष्ठिराला पाहून) पहिली पाळी तुझी. धनुष्याला बाण जोड. त्या पक्ष्यावर नेम धर. युधिष्ठिराने धनुष्याला बाण जोडला आणि पक्ष्यावर नेम धरला.
 
द्रोणाचार्य : आता तुला हे झाड दिसते का? मी दिसतो का? तुझे भाऊ दिसतात का?
 
युधिष्ठिर : मला ते झाड दिसते, आपणही दिसता, हे भाऊही दिसतात आणि हा पक्षीही दिसतो.
 
द्रोणाचार्य : तू पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेऊ शकणार नाहीस. बाजूला हो. मग दुर्योधनाची पाळी होती. त्यालाही द्रोणाचार्यांनी बाण जोडून नेम धरायला सांगितले.
 
द्रोणाचार्य : दुर्योधना, तुला हे झाड दिसते का? मी दिसतो का? तुझे भाऊ दिसतात का?
 
दुर्योधन : होय, मला हे झाड दिसते. आपण दिसता. माझे भाऊही दिसतात आणि पक्षीही दिसतो. द्रोणाचार्यांनी त्यालाही बाजूला होण्यास सांगितले. द्रोणाचार्यांनी आपला पुत्र अश्वत्थाम्याला 'काय दिसते', असे विचारल्यावर त्यानेही 'मला झाड, गुरू, मित्र, व पक्षी दिसतो आहे, असे सांगितले. इतर शिष्यांनाही द्रोणाचार्यांनी तेच प्रश्न विचारले. सगळ्यांनी तशीच उत्तरे दिली. त्या सगळ्यांना द्रोणाचार्यांनी वेध घेऊ दिला नाही. शेवटी त्यांनी अर्जुनाला बोलावले. अर्जुनाने धनुष्याला बाण लावला आणि नेम धरला.
 
द्रोणाचार्य : अर्जुना, तुला हे झाड दिसते का? मी दिसतो का? तुझे भाऊ दिसतात का?
 
अर्जुन : मला केवळ पक्ष्याचा डोळा दिसतो. झाड दिसत नाही. आपण दिसत नाही. माझे भाऊही दिसत नाहीत.
 
द्रोणाचार्य प्रसन्न झाले.
 
द्रोणाचार्य (थोडा वेळ थांबून) : नीट विचार करून उत्तर दे. तुला पक्षीच दिसतो की आणखी काही ते नीट सांग पाहू.
 
अर्जुन : मला केवळ त्या पक्ष्याचा डोळा दिसतो. इतर काही दिसत नाही. अर्जुनाचे हे उत्तर ऐकून द्रोणाचार्यांना आनंद झाला. ते म्हणाले, बाण सोड. अर्जुनाने बाण सोडून पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेतला. द्रोणाचार्यांनी अर्जुनाची पाठ थोपटली.