राजाभाऊ जोशी अगदीच साधे गृहस्थ होते. वयाची पन्नाशी उलटलेले राजाभाऊ रेल्वे विभागात, भुसावळ रेल्वे स्टेशनच्या आउटरवर असलेल्या बी केबिनमध्ये सिग्नल इन्चार्ज होते. रेल्वेचा हार्ड जॉब. शिवाय सिग्नल इन्चार्ज म्हणजे अगदीच जबाबदारीचे काम. तरीही राजाभाऊ आपलं काम पूर्ण जबाबदारीने व शिताफीने करायचे. पण त्यांचे नशीबच खडतर.
केबिनमध्ये इतका हार्ड जॉब केल्यानंतर सुद्धा घरी त्यांच्या नशिबात सुख नव्हते. त्यांच्या घरी ते स्वत: व त्यांची पत्नी सुशीलाबाई हे दोघेच जण होते. लग्नाला वीस वर्ष झाल्यानंतरसुद्धा घरी पाळणा हालला नव्हता. या गोष्टीच जेवढं दु:ख सुशीलाबाईंना होत तेवढच राजाभाऊंना पण होतं. पण ते आपलं दु:ख कुणाला दाखवत नव्हते. या बाबतीत कधीही सुशीलाबाईंना हिणवतही नव्हते. उलट पत्नीचे दु:ख दूर करण्याकरिता घरच्या प्रत्येक कामात तिची मदत करायचे.
घरची परिस्थिती साधारणच होती. पोटी अपत्य नसल्याच्या दु:खामुळे सुशीलाबाई खंगून गेल्या होत्या. पुरुषाचा वेळ कसाही बाहेर, ऑफिसच्या कामात, मित्र मंडळीमध्ये निघून जातो. पण बाईला तर घरीच राहायचे असते. त्यामुळे तिला शेजार पाजारच्या कुत्सित बोलण्यांना व नजरेला तोंड द्यावं लागायचं. हे सर्व सुशिलाबाईंना असह्य व्हायचे. यामुळे त्या वरचेवर आजारी पडू लागल्या. राजाभाऊंना बायकोची स्थिती कळत होती. म्हणूनच ते घरचा स्वयंपाक, भांडी घासण्यापासून तर स्वत:च्या कपड्याबरोबर बायकोचे कपडेही धुवायचे. बायकोला ते करत असलेली मदत बघून त्यांचे मित्र त्यांना 'जोरू का गुलाम' म्हणायचे.
असेच दिवस जात होते. राजाभाऊ दु:ख विसरण्यासाठी म्हणून सुटीच्या दिवशी मित्रांच्या मैफलीत जायचे. तिथे रमी व ब्रिजचा डाव खेळायचे. 'ड्रिंक'पण करायचे. अशाच एका सुटीच्या रात्री मित्रांची मैफल जमली होती. रमीचा डाव सजला होता. मधून-मधून 'ड्रिंक'चे पेग पण चालले होते व मित्राच्या अचकट-विचकट गप्पांना उधाण आलं होत.
राजाभाऊच्या ग्रुपमध्ये त्यांचे एक मित्र शांताराम अवारे होते. मिलमधून जॉबर असताना रिटायरर्ड झाले होते. अत्यंत स्वार्थी व हलकट मनुष्य! पण आता ते या क्लबचे एक सन्माननीय सदस्य होते. ते म्हणाले - हे बघा राजाभाऊ घरच्या बाईला जास्त भाव देऊ नये, जशी आपल्या पायामध्ये वहाण असते तीच बायकोची जागा. तिला वाहणेपेक्षा जास्त किंमत देऊ नये. नाही तर ती आपल्याच डोक्यावर मिरे वाटू लागते. लगेच क्लबचे दुसरे सदस्य बाबासाहेब जाधव यांनीही त्यांच्या म्हणण्याची री ओढली. ते म्हणाले, ''अहो माझ्या घरीपण बायको अशीच वागू लागली होती. मग काय एका दिवशी हातात असलेल्या मोगरीने तिचा बदडून काढलं तेव्हापासून अगदी सुतासारखी सरळ झाली. आता मी बस म्हटलं तर बसते व ऊठ म्हटलं तर ताडकन उठून उभी राहते.'' यावर मित्रांमध्ये एकदम हशा पिकल्या व ड्रिंकचा एक राउंड पुन्हा झाला.
तिसरे सदस्य बबनराव ढाकणे एकदम काही आठवल्यासारखं करून म्हणाले - माझ्या घरी तर फक्त माझंच चालतं. एकदा जेवताना बायकोला वरण गरम करून देण्यास सांगितले. तिने माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. मी म्हटलं इथे जिवंत देव तुझ्यापुढे असताना त्या दगडाची काय पूजा करते! तरीसुद्धा तिनी माझं म्हणणं ऐकलं नाही. मग मी देवघरातल्या उदबत्तीनेच तिच्या अंगावर चार चटके दिले तेव्हापासून ती अशी सरळ झाली की मी घरी गेल्यावर पहिल्यांदा मला काय हवं ते बघते. मगच दुसरं काम करते. नाही तर हे आमचे शेंदाड शिपाई राजाभाऊ. आजारी आणि वांझोट्या बायको समोर शेपूट हालवत असता. आता आपण सर्व मिळून या 'जोरू का गुलाम'च स्वागत करू.
सर्व मित्रांनी दारूच्या नशेमध्ये झोकांड्या देत टाळ्या पिटल्या. राजाभाऊंनाही दारू चांगलीच चढली होती. त्यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांचं डोकं सुन्न होऊन गेलं. रात्रीचे अकरा वाजले होते. ते लगेच उठून घरी गेले. बहुतेक सुशीलाबाईंना आजारपणामुळे व घरच्या कामामुळे झोप लागून गेली असावी. राजाभाऊंनी एक दोन आवाज दिले. त्यांनी फक्त कड बदलली. मनामध्ये इच्छा असून पण शरीर अशक्तपणामुळे उठायला साथ देत नव्हतं. त्यांची उठण्याची हिंमत झाली नाही.
इकडे राजाभाऊच्या कानात आपल्या मित्राचे संवाद व त्यांचे कुत्सितपणाने हसण्याचे आवाज जोराजोराने ऐकू येऊ लागले. राजाभाऊचा चेहरा अंधारामध्ये अधिकच भेसूर दिसू लागला. धाडकन दरवाजा लोटून ते आत गेले. कडी निखळून पडली. त्यांच्या हातामध्ये जळती सिगारेट होती. त्या सिगारेटने त्यांनी झोपलेल्या सुशीलाबाईच्या अंगाला चटके देणे सुरू केले. अंगात ताप असलेल्या सुशीलाबाई जीवाच्या आकांताने ओरडत होत्या. राजाभाऊंना काहीच ऐकू येत नव्हतं. फक्त त्यांच्या कानामध्ये त्यांच्या मित्रांचा हसण्याचे आवाज ऐकू येत होते. पिसाळलेल्या पशू सारखे ते निरपराध सुशिलाबाईच्या अंगाला चटके देत होते.
यातना सहन न होऊन सुशीलाबाई बेशुद्ध पडल्या. पण राजाभाऊ त्यांना तसेच चटके देत राहिले. कुसंगतीमुळे अविचारी झालेल्या राजाभाऊच्या मनातला अंगार अद्याप शांत झाला नव्हता.....