रविवार, 8 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कथा
Written By वेबदुनिया|

फुटबॉल

- प्रकाश दांडेकर

फुटबॉल कथा साहित्य कविता साहित्यकार लेखक
ND
त्या सुपरफास्ट ट्रेनच्या एसी कोचमध्ये इतर प्रवाशांबरोबर एक वृद्ध जोडपे पण होते. त्यांनी घातलेल्या कपड्यावरून आणि राहणीवरून त्यांची परिस्थिती अगदीच बेताची दिसत होती. असे असतानाही अशा साधारण आर्थिक परिस्थितीचे जोडपे एका सुपरफास्ट ट्रेनच्या एसी कोचामध्ये कसे बसले याविषयी इतर सहप्रवाशांमध्ये कुतूहल होते. तितकंच ते खटकतही होते. नंतर तर त्यांच्यात आपसांत त्याची चर्चाही सुरू झाली.

एक गृहस्थ म्हणाले 'म्हातारा-म्हातारीला बहुतेक लाटरी लागली असावी. म्हणून या वयामध्ये अशी मस्त चंगळ चालली आहे.' 'हे बहुतेक तीर्थयात्रेला चालले असतील. कारण हे सुख तर सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्यावरच मिळतं.'दुसरा एक जण म्हणाला.

प्रत्येकजण काही ना काही तर्क लढवत होता. तितक्यात कुणीतरी म्हणाले 'अहो म्हातारपणात डोकं सरकलेलं दिसतंय, अंगावर फाटके कपडे घालणार्‍याला एसीचा प्रवास कसा परवडतोय? आता एका आणखी गृहस्थाला आपलं मत व्यक्त करायची संधी मिळाली त्यांनी तर कहरच केला म्हणाले 'अहो मला तर हे विदाऊट तिकीट दिसताहेत. हेच लोक वेळ साधून चुपचाप इतर प्रवाशांचं सामान लंपास करून उतरून जातात.'

'आपलाही फुटबॉलच तर झाला आहे. म्हणून तर एका घरातून दुसर्‍या घरामध्ये भिरकावलो जातोय.'
इतक्या वेळ सर्वांच बोलणं निमुटपणे ऐकून घेणारे या वृद्ध जोडप्यामधले अण्णा एकदम उठले व म्हणाले - 'हो मी वेडाच आहे' पण चोर नव्हे. अहो ज्यांनी आपल्या आयुष्य भराची कमावलेली कमाई आपल्या तीन मुलांमध्ये हे समजून वाटून दिली की मला तर तीन मुलं आहे मला काय कमी आहे. पण माझ्या तिन्ही मुलांपैकी एकाही मुलाच्या घरात आम्हा म्हातारा-म्हातारीला ठेवू शकेल इतकी जागा नाही. म्हणून त्यांनी चार-चार महिने आम्हाला सांभाळण्यासाठी वाटून घेतले आहे. आज मोठ्या मुलाचे चार महिने पुरे झाले. स्लीपर कोचमध्ये जागा नव्हती म्हणून त्यांनी एसी कोचमध्ये रिझर्वेशन करवून, मधल्या मुलाकडे आमची रवानगी करून दिली.

आपली व्यथा सांगताना अण्णाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तितक्यात ट्रेन हळूहळू स्लो झाली. बहुतेक कुठलतरी स्टेशन येत होत. खिडकीच्या बाहेर अण्णा पाहत होते. एका ग्राउंडमध्ये काही मुले फुटबॉल खेळत होती. प्रत्येक खेळाडू फुटबॉल जवळ आल्याबरोबर त्याला लाथ मारून दूर करत होता. अण्णा विचार करत होते. 'आपलाही फुटबॉलच तर झाला आहे. म्हणून तर एका घरातून दुसर्‍या घरामध्ये भिरकावलो जातोय.'