रविवार, 8 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कथा
Written By वेबदुनिया|

राक्षस

- प्रकाश दांडेकर

राक्षस साहित्य कथा कविता
ND
मी राहत असलेल्या शहराच्या पॉश कॉलनीमध्ये ती वीस वर्षाची वेडी मुलगी आम्हाला बहुदा दिसत असे. फाटलेले कपडे, केस पिंजारलेले, डोक्यामध्ये कित्येक दिवसापासून तेल न लागलेलं. अंघोळ तर कित्येक महिन्यामध्ये झालेली नसावी. सदैव आपलं डोकं आणि शरीर कराकरा खाजवणार्‍या त्या मुलीचे आई-वडील कोण? ती कोणा बिघडलेल्या श्रीमंत तरुणाच्या पापाची निष्पत्ती होती. मग ती वेडी कशी झाली अनेक असे प्रश्न होते, ज्याचं उत्तर माझ्यासकट कॉलनीतील कोणाकडेच नव्हतं.

ती वेडी असली तरी शेवटी एक स्त्री होती. निसर्गाने ज्या गोष्टी स्त्रीला दिलेल्या असतात त्या सर्व तिलाही मिळालेल्या होत्या. त्यात होत तिच उफाड्याचं शरीर. या शरीरावरचा आकर्षून घेणारा भाग सांभाळायचे तिला भान नव्हते. त्यात तिचा काहीच दोष नव्हता, कारण एखाद्याच्या शरीराला इजा झालेली असते, पण तिच्या मेंदूलाच इजा झालेली होती.

ती तरुण होती, तिच्या फाटक्या कपड्यामधून तिचं उघड शरीर लोकांना दिसायचं. त्याकडे काही टारगट मुलं कोणी पाहत तर नाही असं समजून चोरून पाहायचे. पण त्याचबरोबर तिचा गलिच्छ वास मारणारा देह आणि अवतार पाहून तिच तिला 'डाकिण' म्हणूनही चिडवायचे. ती त्यांना चिडून मारायला धावायची. ते पळून जायचे असा क्रम कित्येक दिवस चालत होता.

मला त्या मुलांचा राग यायचा. पण समाजामध्ये आपल्या व्हाईट-कालर इभ्रतीला पाहून मी मनात त्यांना भीत होतो.त्यांच्या वाटेला जायचं धाडस नव्हतं. काही दिवसाने मला नोकरीमध्ये दीड वर्षाच्या ऑफिशियल ट्रेनिंगसाठी जबलपूरला जावं लागलं. वर्षभरानंतर नवरात्रीमध्ये आमच्या घरी नवमीला एक कुळधर्म व कुळाचाराचा धार्मिक कार्यक्रम होता. त्यामध्ये भाग घेण्यासाठी मी सहपरिवार आपल्या राहत्या घरी, त्याच कॉलनीमध्ये आई-वडिलांकडे आलो होतो. कार्यक्रमामध्ये सर्व पूजाविधी व ब्राह्मण-सवाष्ण यांचा जेवणानंतर मी सपत्नीक घराच्या समोर जमलेल्या भिकार्‍यांना अन्नदान करायला गेलो. तिथे बसलेल्या भिकार्‍यांमध्ये मला ती वेडी मुलगी पण बसलेली दिसली. तिला पाहून माझं डोकं गरगरायला लागलं. कारण त्या टारगट मुलाच्या शिव्या आणि दगड खाणारी मुलगी 'वाढलेलं पोट' घेऊन चालत होती.

मला प्रश्न पडला, कोणाला तिच्याशी असं दुष्कृत्य करायची हिंमत झाली असेल. ते कोणत्या वृत्तीचे असतील. एकीकडे एका निरपराध मुलीची टिंगल करणारे तिला शिव्या घालून दगड मारणारे व नंतर तिच्यावर पाशवी बलात्कार करणारे मनुष्य होते की राक्षस?

मी लहानपणी वाचलेल्या गोष्टीप्रमाणे राक्षस म्हणजे डोक्यावर शिंग असलेला, डोळ्या आणि तोंडामधून आग ओकणारा व भयानक दादाढी असलेला भेसूर प्राणी असतो ही माझी कल्पना होती. पण त्या निरपराध वेड्या मुलीवर पाशवी बलात्कार करणारी ती टारगट मुलं आठवली की मला वाटत होत की राक्षस हा समाजामध्येच, सभ्य म्हटल्या जाणार्‍या पण नीच वृत्तीच्या लोकांच्या मनामध्येच दडलेला असतो.