शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

मकर संक्रांत विशेष : गूळपोळी

साहित्य -
1/2 किलो गूळ, 1 कप किंवा वाटी हरभराडाळीचं पीठ,1 कप सुक्या खोबऱ्याचा किस,  3/4 कप तीळ, 1/2 कप शेंगदाणे कूट,1/2 कप खसखस,1/2 कप तेल.3/4 कप गव्हाचं पीठ, दीड कप मैदा,2 चमचे तेल, चिमूटभर मीठ.

कृती -
एका कढईत सुक्या खोबऱ्याचा किस सोनेरी रंग येई पर्यंत कोरडंच भाजून घ्या.या नंतर तीळ,खसखस स्वतंत्र कोरडीच भाजून बारीक पूड करावी. शेंगदाणे भाजून साले काढून बारीक कूट करावा. एका भांड्यात 1/2 कप तेल गरम करून या मध्ये हरभराडाळीचे पीठ खमंग भाजून घ्या. गूळ किसणीवर तेलाचा हात लावून किसून घ्या. या किसलेल्या गुळात भाजलेले सर्व जिन्नस (तीळ,खसखस,शेंगदाणे कूट, हरभराडाळीचं पीठ, खोबरे किस)मिसळून मळून घट्ट गोळा करावा.

मैदा,गव्हाचं पीठ,मीठ आणि इच्छा असल्यास हरभराडाळीचे पीठ आणि 2 चमचे तापवलेले तेल पिठात घालूंन पाणी घालून कणीक मळावी ही कणीक मध्यम असावी जास्त सैल किंवा जास्त घट्ट नसावी. कणकेच्या गोळ्याला लागत लागत तेल लावावे.15 मिनिटे गोळा झाकून ठेवावा. गुळाच्या सारणाचे लहान लहान गोळे करून घ्या.
आता कणकेच्या लाट्या बनवून दोन लाट्यां मध्ये गुळाच्या सारणाचा केलेला  1 गोळा  भरून आणि कोपऱ्याचा कड्या बंद करावा. कोरडे पीठ घालून पोळी हळुवार लाटून घ्या. लक्षात ठेवा की पोळी एकाबाजूनेच लाटायची आहे पालटू नये.
मध्यम आचेवर तवा तापत ठेवा आणि पोळी तव्यावर खरपूस भाजून घ्या. भाजल्यावर कागदावर काढून गार होण्यासाठी पसरवून ठेवाव्यात. गुळाची पोळी तुपासह थंड किंवा कोमट खावी गरम खाल्ल्यास तोंड भाजू शकतं. गूळ हा उष्ण प्रकृतीचा असल्याने गुळाची पोळी नेहमी तुपासह खावी म्हणजे उष्णतेचा त्रास होत नाही.पोळी करताना आपण आपली इच्छा आणि आवडीनुसार मैदा जास्त किंवा गव्हाचं पीठ कमी देखील घेऊ शकता किंवा फक्त गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता.तेलाचे मोयन देखील गरम न करता थंड घालू शकता.