तांदळाच्या शेवया (गोडाच्या)
|
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन ते फडक्यावर वाळवावेत. सुकल्यावर ते दळून त्याचे पीठ करून बारीक चाळणीने चाळून घ्यावे. जितके पीठ होईल, तितकेच पाणी घेऊन ते एका पातेल्यात उकळावयास ठेवावे. त्यात चवीला मीठ व दोन चमचे तूप घालावे. उकळी आल्यावर पातेले खाली उतरून लागलीच त्यात पीठ घालावे. नंतर ते ढवळून मंद विस्तवावर ठेवून, दोन वाफा आणून घ्याव्यात. नंतर पातेले खाली घेऊन उकड गरम असतानाच एखादे भांडेघेऊन मळावी. उकड मळून झाल्यावर त्याचे मुटके करावेत. ते मुटके मोदकपात्रात ठेवून वाफ येऊ द्यावी. चांगली वाफ आल्यावर एक एक मुटका शेवपात्रात घालून त्याचा शेव पाडाव्या. नारळ खोवून त्याचे दूध काढावे. अर्धा लिटर दूध घेऊन त्यात हे नारळाचे दूध घालावे. त्यात चांगले गोड होईल, इतकी साखर किंवा गूळ व वेलदोड्यांची पूड घालावी. खावयास देते वेळी डिशमध्ये शेवयांवर दूध घालून द्यावे.
