सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

ज्योतिष वास्तुशास्त्राला पुरक

ज्योतिष या शब्दाचे विश्लेषण केले असता, त्यात ज्योती हा शब्द मुख्‍य आहे. ज्योत म्हणजे अर्थातच दिव्याची प्रकाशित वात. जिथे वात, तिथे प्रकाश म्हणजेच उर्जा आहेच. म्हणजे ज्योतिष हे प्रकाशाचे अर्थातच उर्जेचे शास्त्र आहे.

PR PR
विश्वात सूर्य हा प्रकाशाचा म्हणजेच उर्जेचा फार मोठा स्त्रोत आहे, त्याच्या शक्तीमुळे सुर्यमाला कार्यरत आहे. सूर्यामुळेच पृथ्वीला प्रकाश मिळतो. ज्योतिषशास्त्रात आपण सूर्याची उर्जा गती व प्रकाशमान पृथ्वी याचा होणारा परिणाम व वेळेची गती याचा अभ्यास करतो. म्हणजेच ज्योतिषशास्त्रात आपण सूर्य व सूर्यमालेतील इतर ग्रह चंद्र, मंगळ, बुध, शुक्र, शनी यांच्याबरोबर काळे गृह म्हणून ओळखले जात असलेले राहू व केतू, त्यांची गती, प्रकाश, उर्जा आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम याचा अभ्यास करतो.

जगातील प्रत्येक गोष्टींपासून मिळणारी केंद्रीय स्पंदने, ग्रह वगैरेंच्या नैसर्गिक चक्रानुसार कालचक्राचे ज्ञान तसेच त्याचा पृथ्वीवरील प्राणीमात्रांवर होणारा परिणाम यांना अभ्यासणे हाच ज्योतिषाचा मुख्य विषय आहे.

वैदिक वाङमयात ज्योतिषशास्त्राला डोळ्यांचे स्थान दिले आहे. शरीरात डोळ्यांचे जे महत्त्व आहे तेच वेदांत ज्योतिषाचे आहे.

स्थापत्यवेदात ज्योतिषाचे महत्व :-
या ब्रह्मांडात एकही गोष्ट अशी नाही की तिच्यावर नवग्रहाचा प्रभाव पडला नाही. पृथ्वीवरच्या सर्व सजीव-निर्जीव, चेतन- अचेतन, व्यक्त -अव्यक्त पदार्थांमध्ये काम करण्याची जी प्रवृत्ती आहे ती या नवग्रहाच्या व काळाच्या प्रभावाखालीच आहे. प्रत्येक घरावर कोणत्या ना कोणत्या रूपाने नवग्रहांचा किंवा एका विशिष्ट ग्रहाचा प्रभाव असतो.

हा प्रश्न नेहमी विचारला जातो, की वास्तुशास्त्र ही ग्रह-व्यवस्थापन तसेच घरबांधणीची कला किंवा विज्ञान आहे आणि ज्योतिषशास्त्र भविष्य सांगणारे म्हणजेच वर्तवणारे शास्त्र आहे. मग या दोन्ही शास्त्रांचा काय संबंध? म्हणून येथे हे सांगणे आवश्यक आहे, की पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश याबरोबरच मुख्य म्हणजे पृथ्वीची चुंबकीय उर्जा, क्षेत्र, सूर्य व त्याची किरणे त्याची उर्जा हे वास्तुशास्त्रातील आधारभूत घटक आहेत. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र ह्या दोन्हीचा मुख्य आधार सूर्य व पृथ्वी आहे. म्हणूनच या दोहोत परस्पर संबंध तर आहेच, पण ते एकमेकांना पुरकही आहेत. त्यामुळेच वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना ज्योतिषशास्त्राचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.

वर सांगितल्याप्रमाणे स्थापत्यवेद व ज्योतिषशास्त्र हे एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाला (वास्तुविशारदाला) ज्योतिषशास्त्राचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे येणार्‍या जातकाला त्याने कोणत्या शहरात, कोणत्या दिशेला घर बांधायला हवे किंवा कुठले शहर वा जागा त्याच्यासाठी त्याच्या व्यापाराच्या वाढीसाठी उपयुक्त आहे, कुठल्या दिशेची जमीन त्याच्यासाठी चांगली आहे, ती केव्हा खरेदी करायला हवी, त्यावर घर केव्हा बांधावे, मुख्य दरवाजा कुठल्या दिशेला आणि केव्हा बसवावा याविषयीचे संपूर्ण मार्गदर्शन वास्तुविशारदाने त्याला केले पाहिजे. घरबांधणीनंतर रंगाची निवडही महत्त्वाची आहे. घराच्या आत व बाहेर कोणते रंग जातकाला उपयुक्त तसेच लाभदायक ठरतील. घर बांधल्यावर गृहप्रवेश केव्हा करावा या सर्व बाबी जातकाचे जन्मनत्रक्ष तसेच त्याची ग्रहदशा यानुसार ठरवायला हव्यात. येथे वास्तुविशारदाचा ज्योतिषाशी संबंध येतो.