शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Updated : गुरूवार, 19 मार्च 2026 (07:38 IST)

गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी?

गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी?
महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण हिंदू चांद्रसौर दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो. २०२६ मध्ये हा सण गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी साजरा केला जाईल.
 
गुढीपाडवा म्हणजे काय?
'गुढीपाडवा' हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे:
गुढी: म्हणजे 'ब्रह्मध्वज' किंवा विजयाचे प्रतीक असलेले निशाण.
पाडवा: हा संस्कृत शब्द 'प्रतिपदा' वरून आला आहे, ज्याचा अर्थ हिंदू महिन्याच्या शुक्ल पक्षाचा पहिला दिवस असा होतो.
 
तिथी (पंचांग)
चैत्र प्रतिपदा तिथी प्रारंभ: १९ मार्च गुरुवार: सकाळी ६ वाजून ५५ मिनिटापासून
चैत्र प्रतिपदा तिथी समाप्ती: २० मार्च शुक्रवार: सकाळी ४ वाजून ५० मिनिटापर्यंत
उदय तिथीनुसार गुडीपाडवा १९ मार्च गुरुवार रोजी साजरा करण्यात येईल.
 
गुढीपाडवा शुभ मुहूर्त
सकाळी सूर्योदयानंतर गुढी उभारणे शुभ मानले जाते
सूर्योदय १९ मार्च गुरुवार सकाळी ६ वाजून २६ मिनिटावर
 
गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी?
गुढीला साडी नेसवताना शक्यतो शुभ मानले जाणारे रंग वापरले जातात:
पिवळा - सर्वात जास्त शुभ मानला जातो. नवीन सुरुवात, समृद्धी आणि सूर्यदेवाशी संबंधित रंग आहे. पिवळा रंग मांगल्याचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.
केशरी/नारंगी - ऊर्जा आणि उत्साह दर्शवतो. हा रंग शक्ती, चैतन्य आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते.
लाल - शक्ती, विजय आणि मंगलकार्याचे प्रतीक आहे.
हिरवा - नवीन जीवन, ताजेपणा आणि निसर्गाशी जोडलेला रंग असल्यामुळे तसेच निसर्ग आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून हिरव्या रंगाची साडीही अनेक ठिकाणी वापरली जाते.
गुलाबी - सौम्यता आणि सुख-शांती दर्शवतो.
 
साडीचा प्रकार: गुढीला नेसवली जाणारी साडी शक्यतो रेशमी किंवा जरी काठाची असलेली असावी. यामुळे गुढीला एक प्रकारची शोभा येते. जर तुम्हाला मोठी साडी नेसवणे कठीण जात असेल, तर तुम्ही नवीन रेशमी खण देखील वापरू शकता.
 
वर्ज्य रंग: गुढी ही विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक आहे, त्यामुळे काळा रंग किंवा अत्यंत फिकट/निस्तेज रंग वापरणे टाळावे.
 
गुढीपाडव्याची पूजा करताना सर्वप्रथम एक स्वच्छ लाकडीची काठी घ्यावी. तिला हळदी कुंकू लावून साडी नेसवावी किंवा रेशीम वस्त्र बांधावे. साडी नेसवल्यानंतर त्यावर हळद-कुंकू लावलेला एक तांब्या ठेवावा. मग तांब्याला कडुनिंबाचा पाला, साखरेची गाठी घालावी. गुढीला हार घालावा. ही गुढी आपल्या दारावर उभारावी. गुढीच्या पायाशी रांगोळी काढावी. गुढीची विधिवत पूजा करावी व शेवटी गोडाचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी सूर्यास्ताच्या आत गुढीला दही भाताचा नैवेद्य दाखवून ती उतरवावी.