बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मार्च 2020 (15:11 IST)

डॉ. माधुरी कानिटकर : महाराष्ट्राची हिरकणी

देशातील तिसर्‍या महिला लष्करी अधिकारी बनण्याचा मान डॉ. माधुरी कानिटकर यांना मिळाला आहे. लष्करी अधिकारी ते लेफ्टनंट जनरल पदापर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर होता. या खडतर मार्गावरआपल्या आजीला आदर्श मानून त्यांनी हा बहुमान मिळवला आहे. त्यांचे वडील रेल्वेत असल्याने त्यांचे  शिक्षण वेगवेगळ्या भागात झाले. मात्र शाळेत घातलेला युनिफॉर्म पुढे कॉलेज आणि आता लष्करातदेखील त्यांनी घातला. 37 वर्षांपासून हा युनिफॉर्म  कधीच न काढल्याचे त्यांनी म्हटले आहे. लेफ्टनंट जनरल पदार्पंतच्या प्रवासात प्रत्येक वळणावर पतीने साथ दिल्याचे डॉ. माधुरींनी सांगितले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी महिलांसाठी सेमिनार घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.
 
जसेजसे मुलींना प्रोत्साहन मिळेल तसे सर्वच क्षेत्रात मुलींची संख्या वाढेल. सर्वांनीच बॉर्डरवर जावे असे काही नाही, पण मुली जेव्हा या क्षेत्रात येतील तेव्हा सुविधादेखील वाढतील असे मत डॉ. माधुरींनी मांडले आहे. जेव्हा पती-पत्नी दोघेही लष्करात असतात त्यावेळी येणार्‍या कठीण प्रसंगांविषी डॉ. माधुरींनी सांगितले आहे. त्या वेळेस विमानाची कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळे पोस्टिंगच्या ठिकाणी जाणे कठीण होत होते. त्यावेळी फोन, इंटरनेट नव्हते. अशावेळी कधीतरी पती रूग्णालयातील मिल्ट्रिी फोनवरती फोन करायचे. मात्र त्यांना मुलीसोबत बोलता यायचे नाही. अशा वेळी मुलगी रडायची. तिची अनेकदा समजूत घालावी लागायची. अशा अनेक कडू- गोड आठवणी डॉ. माधुरींनी सांगितल्यात. पण पती आणि पत्नी दोघेही लष्करात आणि दोघेही लेफ्टनंट जनरलपदार्पंत पोहोचलेले पहिले पती-पत्नी ठरले आहेत. भारतीय लष्कराच्या इतिहासात असा अनोखा प्रसंग पहिल्यांदाच आला आहे की, नवरा आणि बायको दोघेही लष्करात आणि दोघेही लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत स्वतःच कर्तृत्वाने पोहोचले.
 
लहान वयापासूनच महिलेचा आदर करावा हे शिकवण्याची समाजाला गरज असल्याचे मत कानिटकर यांनी  मांडले. मुली मुलांपेक्षा कमी नाहीत असे म्हणताना दुसरीकडे मुलेदेखील मुलींपेक्षा कमी नसल्याचे त्यांना सांगितले पाहिजे. जेव्हा पुरुषाला वाटेल पत्नीने शिकून घरी बसू नये तेव्हाच समाजामध्ये बदल होऊ शकतो, असे कानिटकर म्हणाल्या. आपल्या आयुष्यातल्या खडतर मार्गावर मात करत डॉ. माधुरी आता लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचल्या   आहेत. त्यांचा हा खडतर प्रवास सध्याच्या तरुण मुलींसाठी प्रेरणादायी आहे. लाखो मुलींसाठी रोल मॉडेल बनलेल्या महाराष्ट्राच्या या हिरकणीला शुभेच्छा.