सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By
Last Updated : गुरूवार, 9 मे 2024 (15:49 IST)

Marathi Kavita हंबरून वासराले चाटती जवा गाय

cow
हंबरून वासराले
चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी 
दिसती माझी माय
 
आया बाया सांगत व्हत्या 
व्होतो जवा तान्हा
दुष्काळात मायेच्या माजे
आटला व्हाता पान्हा
पिठामंदी पाणी टाकून 
पाजत जाय
तवा मले पिठामंदी 
दिसती माझी माय
 
कान्याकाट्या येचायला 
माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या 
फिरे अनवाणी
काट्याकुट्यालाही तिचं 
मानत नसे पाय
तवा मले काट्यामंदी 
दिसती माझी माय
 
बाप माझा रोज लावी 
मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता 
घेऊदी हाती कामं
शिकून श्यानं कुठं मोठा
मास्तर होणार हाय
तवा मले मास्तरमंदी 
दिसती माझी माय
 
दारू पिऊन मायेला मारी 
जवा माझा बाप
दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप
थर थर कापे आन 
लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला
बांधली जसी गाय
तवा मले गायीमंदी 
दिसती माझी माय
 
बोलता बोलता येकदा
तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हणे राजा तुझी
कवा दिसलं रानी
भरल्या डोळ्यान
भरल्या डोळ्यान कवा पाहीन 
दुधावरची साय
तवा मले सायीमंदी 
दिसती माझी माय
 
म्हणून म्हणतो आनंदानं 
भरावी तुझी वटी
पुन्हा येकदा जन्म घ्यावा
माये तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया
धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी
दिसती माझी माय
 
कवी - स. द. पाचपोळ