बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (09:19 IST)

सराफी दुकानाच्या भिंतीत सापडली १० कोटींची रोकड आणि १९ किलो चांदीच्या विटा

10 crore cash and 19 kg silver bricks were found in the wall of a goldsmith's shop सराफी दुकानाच्या भिंतीत सापडली १० कोटींची रोकड आणि १९ किलो चांदीच्या विटा
मुंबईच्या झव्हेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पदरित्या वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आले. त्यानंतर जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही. कंपनीच्या 35 चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आणि 19 किलो वजनाच्या (13 लाख रुपये किमतीच्या) चांदीच्या विटा आढळून आल्या.
 
राज्य जीएसटी विभागाने ही जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने ही रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी चोरी शोधणे आणि कारवाईची मोहिम तीव्र केली असून हजारो कोटींची जीएसटी चोरी शोधण्यात यश मिळविले आहे. राज्य करविभागाचे सहआयुक्त राहूल द्विवेदी, उपायुक्त विनोद देसाई यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जीएसटी चोरीविरुद्धची कारवाई या पुढच्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कर आयुक्त राजीव मित्तल यांनी दिली आहे.