1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2024 (14:55 IST)

Mumbai सीव्हर टँकेत पुन्हा 2 जीवांचा बळी

मुंबईतील मालाडमध्ये भीषण अपघात झाला आहे. जिथे गटाराच्या टाकीत पडून दोघांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. मालाड (पूर्व) येथील एका बांधकामाधीन इमारतीच्या 35 फूट खोल गटाराच्या चेंबरमध्ये पडून दोन जणांचा मृत्यू झाला, तर एका 19 वर्षीय तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 3.50 च्या सुमारास एक मजूर रहेजा टॉवरखालील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या गटाराच्या टाकीत नियमित तपासणीसाठी शिरला. बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने त्याला पाहण्यासाठी आणखी एक व्यक्ती टाकीत शिरली आणि त्यानंतर आणखी एक व्यक्ती टाकीत घुसली. तिघेही बाहेर न आल्याने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.
 
मालाड (पूर्व) येथील राणी सती मार्गावरील पिंप्रीपाडा येथे रहेजा टॉवर प्रकल्पाचे काम सुरू आहे. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपासात निष्काळजीपणा आढळल्यास भादंवि कलम 304 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.
 
श्वासोच्छवासाचे उपकरण परिधान केलेले अग्निशमन दलाचे जवान गटाराच्या टाकीत गेले असता त्यांना सर्वजण बेशुद्धावस्थेत आढळले. गटाराच्या टाकीचा मॅनहोल चेंबर खूपच छोटा होता, त्यामुळे तेथे साचलेल्या वायूमुळे तिघांचा श्वास गुदमरल्याचा संशय आहे.
 
रघु सोलंकी (50) आणि जावेद शेख (36) अशी मृतांची नावे आहेत, तर आकिब शेख (19) यांची प्रकृती चिंताजनक आहे.