1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2022 (23:07 IST)

राज ठाकरे यांच्या भाषणातले 5 प्रमुख मुद्दे

ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावा, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी राज ठाकरे बोलत होते.
 
ते म्हणाले, "माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. तुम्ही ईडी, इन्कम टॅक्सना धाडी टाकताय ना, पोलिसांना विचारा. झोपडपट्ट्यातल्या मदरशांवर धाडी टाका. काय काय हाती लागेल. प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील.
 
"ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांत दिसतात का?"
याशिवाय राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात शिवसेना, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर सडकून टीका केली. राज यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे पाहूयात.
 
1. उद्धव ठाकरेंवर टीका
राज यांनी भाषणाची सुरुवात करताना म्हटलं, "2019ची विधानसभा निवडणूक आठवा. भाजप आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. निकाल लागल्यानंतर शिवसेनेला खासकरून उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला की मुख्यमंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षं ठरली होती. आमच्याशी तर कधी बोलला नाहीत तुम्ही. महाराष्ट्रभरच्या सभांमध्ये बोलला नाहीत.
 
"मुख्यमंत्री फडणवीस होतील असं पंतप्रधान बोलले तेव्हा तुम्ही व्यासपीठावर होतात, तेव्हाही तुम्ही काही बोलला नाहीत. जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडकतंय, तेव्हा अडीच वर्षांची टूम काढली. एकांतात बोलले होते, मग बाहेर का नाही बोलले? जी गोष्ट सगळ्या लोकांसमोर येणार आहे ती चार भिंतीत का केलीत.
 
"एक दिवस सकाळी उठून पाहिलं तर जोडा वेगळाच. पळून कोणाबरोबर गेले. लग्न कोणासोबत? तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं ते शरद पवार आणि काँग्रेससोबत जायला नव्हतं केलं. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणती शिक्षा देणार?"
 
2. शरद पवारांवर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप
राज यांनी आजच्या भाषणात शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप केला.
 
ते म्हणाले, "मी हिंदुत्त्वावर बोलणार आहे. माझ्या दृष्टीकोनातून हिंदुत्त्वं काय आहे ते मांडणार आहे. अयोध्येला जाणार, आता तारीख नाही सांगत. कुठलं हिंदू आणि हिंदुत्त्वं घेऊन बसलो आहोत आपण. हिंदू हा फक्त हिंदू - मुसलमान दंगलीत हिंदू असतो. तो 26 जानेवारी 15 ऑगस्टला भारतीय असतो. चीनने आक्रमण केल्यावर त्याला कळतच नाही की तो कोण आहे. तेव्हा तो बंगाली, पंजाबी, मराठी होतो.
 
"त्यानंतर तो मराठा होतो, ब्राह्मण होतो. राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवीय, शरद पवारांना ही गोष्ट हवीय. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर जातीचं राजकारण वाढलं. दुसऱ्या जातीचा द्वेष वाढला. कधी मराठा आरक्षणाचं आमिष दाखवायचं तर कधी बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट. महाराष्ट्र जातीत खितपत पडलाय.
 
"पुस्तकांमध्ये काहीतरी वेडंवाकडं छापून आणायचं आणि त्यावरून जातीपातीचं राजकारण करायचं. कोण जेम्स लेन? जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? ज्याचा या देशाशी संबंध नाही, तिथे इथे येतात आणि आमच्या जिजाऊ - शिवरायांविषयी वेडवाकडं लिहीतात. त्यावरून जातीपातीचं राजकारण तापवलं जातं."
 
 
3. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा समाचार
उद्धव ठाकरे सरकारमधील काही मंत्री सध्या जेलमध्ये आहेत. तर काहींच्या मागे चौकशी संस्थांचा ससेमिरा लागला आहे.
 
हा मुद्दा पकडून राज म्हणाले, "इतकी वैभवशाली परंपरा असलेला महाराष्ट्र कुठे आणून ठेवला. गृहमंत्री 100 कोटी मागितले म्हणून जेलमध्ये जातो, आणखी एक मंत्री दाऊदशी संबंध आहे म्हणून जेलमध्ये जातो.
 
"हे महाराष्ट्रात चालू आहे. जेलमध्ये अडीच वर्षं असणाऱ्याला पहिला मंत्री करण्यात आलं. मुंबईत स्फोट घडवणाऱ्या नवाब मलिक यांच्याशी संबंध असणारे जेलमध्ये गेले, यांना फरक पडत नाही."
 
4. शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारी
राजकीय मुद्द्यांशिवाय राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात शेतकरी आत्महत्या आणि नोकऱ्यांचा प्रश्नही उपस्थित केला.
 
ते म्हणाले, "शेतकरी आत्महत्या करतोय त्यामागे परकीय हात आहे का? मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, यात परकीय हात आहे का? मतदारांचं मला कौतुक वाटतं. ज्याने काम केलं, त्याला बाजूला सारलं आणि ज्याने काम केलं त्याला सत्तेवर बसवलं?
 
"नाशिक मनपामध्ये ज्याप्रकारचं काम केलं ते आधी झालं नाही आणि नंतरही झालं नाही. पण त्याची पावती काय मिळाली तर सत्तेतून बाहेर व्हावं लागलं."
 
5. ईडीची कारवाई आणि बाळासाहेबांचं स्मारक
राज ठाकरे पुढे म्हणाले, "चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना नोटिस आली, पण हे गेले नाही. संपत्ती जप्त करायला लागले तेव्हा मुख्यमंत्र्यांना राग आला. जनतेनं नादान राजकारणाला बळी पडू नये, एवढीच अपेक्षा आहे.
 
"BEST चे प्लॉट बिल्डरांच्या घशात घालताना, मुंबईत प्लॉट नाही सापडला बाळासाहेबांच्या स्मारकासाठी?"
दरम्यान, मनसेच्या या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते शिवाजी पार्कावर जमा झाले होते.
 
'राज तिलक की करो तैय्यारी, आ रहे है भगवा धारी,' अशा आशयाचे फलक त्यांच्या हातात दिसून येत होते.
 
ही तर भाजपच्या प्रवक्त्यांची सभा - शिवसेनेची टीका
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर आता राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे.
 
शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी ट्विट करत म्हटलंय, "भाजपच्या 'प्रवक्त्यांनी' केलेली सभा पाहिली. भाजपची बी टीम एमआयएम होती ते माहित होते, भाजपची सी टीमपण आहे हे आज दिसले. आधी आपला रंग ठरवा, मग दिशा ठरवा. भाजपची सुपारी घेऊन मराठी माणसाच्या मुळावर येऊ नका."
काँग्रेस नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट केलंय की, "राज ठाकरे यांच्या माहितीसाठी देशात गॅस, पेट्रोल-डिझेल यांच्या किंमती वाढल्याने सामान्य माणसाचं जगणं मुष्कील झालं आहे. देशाला खरा धोका तुमच्यामागे 'ED' लावणाऱ्यांपासून आहे. खरा धोका ओळखा. बाकी गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा."