शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शनिवार, 2 एप्रिल 2022 (08:53 IST)

मुंबई मेट्रोच्या मार्गिका क्र.२- अ आणि ७ चे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई मेट्रोच्या 2– अ या दहिसर ते डहाणूकरवाडी  मार्गावरील आणि मेट्रो 7 दहिसर ते आरे या दोन मार्गिकांवरील मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत  2 एप्रिल रोजी, गुढीपाडव्यापासून दाखल होणार आहेत. या दोन्ही मार्गिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार राहणार आहेत.
 
मुंबईतील आरे रोड, गोरेगाव पूर्व येथील संत पायस एक्स महाविद्यालयाच्या पटांगणात उद्या, दि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित या लोकार्पण कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, विधानरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
 
दहिसर ते डहाणूकरवाडी या  मेट्रो २-अ मार्गावर ९ स्थानके असून यामध्ये दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एक्सर, बोरिवली पश्चिम,पहाडी एक्सर, कांदिवली पश्चिम, डहाणूकर वाडी  स्थानकांचा समावेश आहे. दहिसर ते आरे या मेट्रो ७ मार्गावर १० स्थानके  आहेत. आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोयसर, मागाठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान, ओवरी पाडा, दहिसर पूर्व या स्थानकांचा त्यात समावेश आहे. सुरुवातीच्या काळात सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत दोन्ही मेट्रो मार्ग सुरू राहणार असून एका मेट्रो ट्रेनला सहा कोच असतील. एका मेट्रोमधून २ हजार २८० प्रवासी प्रवास करु शकतील.