शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (14:36 IST)

मुंबई उपनगर जिल्ह्यातील विद्यमान मतदारांकडून ‘आधार’ची माहिती १ ऑगस्टपासून संग्रहित करणार

aadhar card
मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार यादीतील नागरिकांचा आधार क्रमांक मिळविण्याचा उद्देश मतदारांच्या मतदार यादीतील मतदार नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे आहे. मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार निवडणूक कायद्यामध्ये व नियमामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

त्यानुसार 1 ऑगस्ट 2022 पासून मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये विद्यमान मतदारांकडून ‘आधार’ क्रमांक संग्रहित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
 
मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदार यादीमधील प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरुपात आणि नियमाप्रमाणे आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आलेले आहे. मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आधार संकलनामागील उद्देश आहे. तथापि, ‘आधार’ क्रमांक सादर करणे मतदारांच्या वतीने ऐच्छिक असणार आहे, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 
मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठीची सुविधा पोर्टल/अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्ज क्र.6ब भारत निवडणूक आयोगाच्या https://eci.gov.in/ आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांचे https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळांबरोबरच ERO Net. GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असणार आहे. पोर्टल/ अॅपच्या माध्यमातून मतदारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज क्र.6ब भरुन आधार क्रमांक नोंदवून प्रमाणीकरण करता येईल. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत घरोघरी भेटी देऊन विद्यमान मतदारांकडून नमुना क्र.6ब द्वारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यात येतील. केवळ आधार सादर करण्याच्या असमर्थतेमुळे मतदारांचा नावे मतदार यादीतून काढून टाकली जाणार नाहीत, तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व विद्यमान मतदारांनी आधार क्रमांक संकलनाच्या दि. 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणाऱ्या मोहिमे मध्ये मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पत्रकातून करण्यात आले आहे.