1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (08:21 IST)

सीए परीक्षेत मुंबईचा मीत शहा देशात पहिला; मिळविले तब्बल एवढे गुण

राष्ट्रीय स्तरावरील सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट (सीए) परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुंबईच्या मीत शहा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतलेल्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.
 
‘मीत यांचे हे यश करिअरच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या होतकरू तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. पारंपारिक आणि नेहमीच्या अशा क्षेत्रांबरोबरच सनदी लेखापाल हे क्षेत्र व्यापार, उद्योग या क्षेत्रासाठी महत्वपूर्ण आहे. त्यामध्ये मीत यांनी घवघवीत यश मिळवणे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या यशात शहा कुटुंबियांचे पाठबळही महत्वपूर्ण ठरले असेल, त्यासाठी शहा कुटुंबियांचेही अभिनंदन ‘ असे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
 
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (ICAI) घेतलेल्या CA च्या परीक्षेत मुंबईचा मीत शहा (८०.२५ टक्के) देशातून पहिला आला आहे. जयपूरचा अक्षत गोयल (७९.८८ टक्के) दुसरा आणि सूरतची सृष्टी संघवी (७६.३८ टक्के) देशातून तिसरी आली आहे.
 
आयसीएआयने दिलेल्या माहितीनुसार, अंतिम परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती. ग्रुप १चा निकाल २१.९९ टक्के लागला. त्यात ६६ हजार ५७५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ हजार ६४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ग्रुप २चा निकाल २१.९४ टक्के निकाल लागला. त्यात ६३ हजार २५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ हजार ८७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या २९ हजार ३४८ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ६९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.