मुंबईत दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात आज (3 जानेवारी) महापालिका मुख्यालयात बैठक पार पडली.
महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाठी बंद ठेऊन ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्याची सूचना बीएमसी शिक्षण विभागाने केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसंच ओमिक्रॉनचे रुग्णही आढळत आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्याचंही मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईतील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मार्च 2020 मध्ये राज्यातील शाळा बंद केल्यानंतर थेट 15 डिसेंबर 2021 रोजी पहिलीपासूनच्या शाळा सुरू झाल्या. परंतु आता पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता पाहता खबरदारी म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.
बीएमसीच्या बैठकीत काय ठरलं?
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा प्रसार मुंबईत होत आहे. जगभरातील प्रवाशांचे मुंबई शहरात येणे-जाणे होत असते. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महापालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व शाळा 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत.
इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहू नये, असंही शिक्षण विभागाने म्हटलं आहे.
मुंबईत 15 ते 18 वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंध लसीकरण ठरलेल्या नियोजनानुसार सुरू राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ लसीकरणासाठी शाळेत बोलवता येईल असंही शिक्षण विभागाने स्पष्ट केलं.
बोर्डाच्या (HSC/SSC) परीक्षांबाबत काय निर्णय होणार?
दहावी आणि बारावीच्या शाळा मात्र सुरू राहणार आहेत. त्याचं कारण म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
दुसऱ्या बाजूला या विद्यार्थ्यांचं लसीकरण सुद्धा सुरू आहे. परंतु बोर्डाच्या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाणार हा प्रश्न कायम आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत राज्य शिक्षण मंडळ म्हणजेच दहावी आणि बारावी बोर्डाचे अधिकारीही उपस्थित आहेत.
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांवर गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही कोरोनाचं सावट दिसून येत आहे. त्यामुळे परीक्षा कशा घ्यायच्या याबाबतही बैठकीत चर्चा होँणार आहे.
काय म्हणाले बीएमसी आयुक्त?
महाराष्ट्रात 2 जानेवारी रोजी 24 तासांत 11 हजार 877 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर एकट्या मुंबईत 8063 नवीन रुग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी पाहता मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी कोरोनाच्या नवीन लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईकरांना काही सूचना केल्या आहेत.
ते म्हणाले, "मुंबईत आज 8063 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 89% रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत. मुंबईत आताच्या घडीला एकूण 29 हजार 819 अॅक्टिव्ह रुग्ण आहे."
आजच्या 8063 नवीन रुग्णांपैकी 506 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. यापैकी 56 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. मुंबईत सध्या 90% हॉस्पिटल बेड रिक्त आहेत.
घरी क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना मी आवाहन करतो की त्यांनी सर्व नियमांचं पालन करावं
मुंबईकरांनी कोरोना प्रतिबंधसंबंधी लागू करण्यात आलेल्या प्रत्येक नियमाचं पालन करावं असंही आवाहन चहल यांनी केलं आहे.
याक्षणी घाबरण्याचं कारण नाही परंतु आपल्या सर्वांना अत्यंत खबरदारी बाळगावी लागणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे.
नागरिकांनी गर्दी जाऊ नये असंही आवाहन त्यांनी केलं.