गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (21:45 IST)

मालमत्ता कर माफ करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर भाजपचे जोरदार प्रत्युत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर आज पहिल्यांदाच जनतेसमोर आले. नगरविकास खात्याची महत्वाची बैठक आज पार पडली. त्यावेळी मुंबईकरांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला. मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. त्याचबरोबर ठाकरे यांनी यावेळी भाजप नेत्यांवरही जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय.
भाजप आमदार अतुल भातखळकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर जोरदार टीका केलीय. ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची घोषणा राजकीय आणि नाट्यमय आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपने आवाज उठवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. वचननाम्यात आश्वासन दिलं असताना २ वर्षे का लागली? तसंच मुंबईकरांना मोफत लस देणार असं युवराजांनी ट्विट वर ट्विट केलं होतं. त्याचं काय झालं? असा सवाल भातखळकर यांनी केलाय.
शिवसेनेनं मुंबईला लुटलं आणि बुडवलं : सोमय्या
शिवसेना फक्त पब्लिसिटी करते. पहिल्या पावसात का हाल होतात. २५ वर्षे शिवसेना सत्तेत आहे, केलं काय? शिवसेनेनं मुंबईला लुटलं आणि बुडवून दाखवलं. लुटण्याचे धंदे बंद करा आणि मुंबईचं भलं करा, अशी जोरदार टीका माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.