सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (23:57 IST)

महाराष्ट्रात कोरोनाचा धोकादायक वेग, 24 तासांत 8 हजारांहून अधिक नवे रुग्ण; तसेच 8 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाचे 8067 नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ओमिक्रॉन प्रकारातील चार प्रकरणांचाही समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सुमारे 2700 रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 8 हजारांहून अधिक नवीन रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या 24,509 वर पोहोचली आहे. शुक्रवारीही आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 1766 लोक बरे झाले आहेत. महाराष्ट्रात झपाट्याने होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता तिसरी लाट येण्याची शक्यता डॉक्टर आणि तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
राज्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने महाराष्ट्र सरकारने उघड्या किंवा बंद ठिकाणी जमणाऱ्यांची संख्या 50 पर्यंत मर्यादित केली आहे. याआधी विवाह समारंभ किंवा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक मेळावे यांना बंद जागेत 100 आणि उघड्या जागेवर 250 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी होती.
गुरुवारी, महाराष्ट्रात ओमिक्रॉन प्रकाराची 198 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, या मध्ये एकट्या मुंबईतील 190 प्रकरणांचा समावेश आहे. शुक्रवारीही चार प्रकरणे समोर आली आहेत. अशाप्रकारे, राज्यात कोरोना विषाणूच्या या नवीन व्हेरियंट ची लागण झालेल्यांची संख्या आता 454 वर पोहोचली आहे.