मुंबईकरांनी बालहट्टच पुरवायचे का, भाजपचा टोला
“मुंबईकरांनी बालहट्टच पुरवायचे का?”, असा खोचक सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला आहे. आरे कारशेडबाबत मेट्रो कारशेड समितीने दिलेला अहवाल महाराष्ट्रासाठी बंधनकारक नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला .
आशिष शेलार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आदित्य ठाकरेंवर टीका केली. “पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? एक दिवस युवराजांनी मला “म्हातारीचा बूट” हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं”, असा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.