रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (08:35 IST)

रस्त्यावरच्या खड्ड्यांनी घेतला तरुण आर्ट डायरेक्टरचा बळी

ठाणे जिल्हयातील भिवंडी येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात हर्ष विनोद सिंह या २६ वर्षाच्या आर्ट डायरेक्टला आपला जीव गमवावा लागला आहे. भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या अपघाताप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली आहे.
 
मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील जोनपूर जिल्ह्यातील हर्ष सिंह हा आई वडिलांसह ठाण्यातील लोकमान्य नगर येथे राहण्यास होता. हर्षचे वडील ठाण्यातील एका शाळेत शिक्षक आहेत. हर्ष आर्ट डायरेक्ट असून बुधवारी सकाळी तो आपल्या रॉयल एनफिल्ड मोटारसायकलवरून वसई जवळील नायगाव येथे शूटिंगसाठी लोकेशन बघण्यासाठी गेला होता. रात्री तो नायगाव येथून ठाण्याला येत असताना अहमदाबाद भिवंडी रोड या ठिकाणी असलेल्या पुलाखाली असलेला खड्डा अंधारात दिसून न आल्यामुळे हर्षची मोटरसायकल खड्ड्यात गेली आणि त्याचा अपघात झाला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघात गंभीर जखमी झालेल्या हर्षला घटनास्थळी दाखल झालेल्या भोईवाडा पोलिसांनी तात्काळ भिवंडीतील एमजीएम रुग्णलयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.