मुंबईत AQI वाढला, प्रदूषण रोखण्यासाठी बोरिवली पूर्व आणि भायखळ्यात बांधकाम थांबवले, नियम तोडल्याबद्दल एफआयआर
Mumbai News : मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे BMC बांधकामावर बंदी घालत आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने बोरिवली पूर्व आणि भायखळा येथे काम बंद करण्यात आले आहे. परिस्थिती सुधारली नाही तर वरळी आणि नेव्हीनगरमध्येही काम बंद करण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितनुसार मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी बीएमसी अनेक कठोर पावले उचलत आहे. प्रदूषणाची पातळी 200 ओलांडल्यानंतर बोरिवली पूर्व आणि भायखळा येथे बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. येत्या 24 तासांत या भागातील सर्व बांधकामे थांबतील, असे बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले. त्याचवेळी वरळी आणि नेव्ही नगर भागात AQI 200 च्या आसपास आहे, येत्या तीन दिवसांत या भागात हवेची गुणवत्ता सुधारली नाही, तर येथेही बांधकामांवर बंदी घालण्यात येईल. तसेच तपासणीदरम्यान प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास काम थांबवण्याच्या नोटीस देण्यात येतील, यानंतरही कोणी काम बंद न केल्यास त्यांच्यावर कलम 52 नुसार एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त गगराणी यांनी खासगी बांधकाम व्यावसायिकांना दिला आहे.
आयुक्त म्हणाले की, बीएमसीने जारी केलेल्या 28 मार्गदर्शक तत्त्वांचे सर्वांनी पालन करावे. यामध्ये खाजगी बांधकामापासून बीएमसी, सरकारी, मेट्रो, बुलेट ट्रेन आणि इतर प्राधिकरणांपर्यंतच्या कामांचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास बांधकामावर बंदी घालण्यात येईल. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी खंदक (रस्त्याच्या कडेला खोदकाम) करण्यास परवानगी देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत मुंबईतील प्रदूषण कमी होत नाही, तोपर्यंत ट्रेंचिंगसाठी नव्याने परवानगी दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
Edited By- Dhanashri Naik