मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 5 मे 2021 (10:08 IST)

बृहन्मुंबई महानगरपालिकेला सुमारे १ लाख लसींचा साठा

कोविड-१९ लसीकरण मोहिमेतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेला सुमारे १ लाख लसींचा साठा  देण्यात आला असून सकाळी हा साठा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे पूर्वीप्रमाणे नियमित लसीकरण होणार आहे.
 
अ) ४५ वर्ष आणि त्यावरील वयोगटामध्ये पहिली आणि दुसरी अशी दोन्ही मात्रा (डोस) पात्र नागरिकांना देण्यात येईल. मात्र, यामध्ये पहिली मात्रा घेण्यासाठी येणाऱ्या कोविन ऍपमध्ये नोंदणी केलेली असणे बंधनकारक आहे. तर दुसरी मात्रा घेण्यासाठी थेट येणाऱ्या (वॉक इन) नागरिकांनाही लस देण्यात येईल. पहिली आणि दुसरी अशा दोन्ही मात्रांसाठी लसीकरण केंद्रांवर स्वतंत्र रांग असेल. या वयोगटातील पात्र नागरिकांचे लसीकरण करताना ८० टक्के नोंदणीकृत तर २० टक्के थेट येणारे नागरिक यांना सामावून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही विभागणी निश्चित करण्यात आली आहे.
 
ब) दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा विचार करता, सध्या सुरू असलेल्या व्यवस्थेप्रमाणे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्देशित ५ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी ५०० नागरिक याप्रमाणे, उद्या (दिनांक ५ मे २०२१) देखील सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’ मध्ये नोंदणी केलेल्या आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ (slot) दिलेले आहे, अशा व्यक्तींसाठी असणार आहे.
 
या ५ लसीकरण केंद्राची नावे पुढीलप्रमाणे –
 
१. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).
२. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
३. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).
४. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.
 
 लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी गर्दी करु नये, संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. लशींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि नागरिकांना अवगत करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.