1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जून 2023 (07:31 IST)

मुंबई हायकोर्टाचे निर्देश, तातडीने केली सुनावणी

mumbai highcourt
मुंबई : देशभरात उद्या बकरी ईद साजरी होणार आहे. पण आता रहिवासी संकुलांमध्ये बक-यांची कुर्बानी देता येणार नाही. कारण मुंबई हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेत याला मज्जाव केला आहे. कोर्टाच्या या निर्देशांचे पालन झाले नाही तर अशांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.
 
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रहिवाशी संकुलात प्राण्यांच्या कत्तलीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेतली. तसेच निवासी संकुलात विनापरवानगी प्राण्यांची कुर्बानी देण्यास मज्जाव असेल, असे निर्देश दिले. तसेच कोर्टाच्या निर्देशांचे पालन न करणा-यांवर कारवाई करण्याचे मुंबई पोलिस आणि मुंबई पालिकेला आदेशही देण्यात आले आहेत.
 
हरेश जैन आणि अपेक्षा शाह या गिरगावातील दोन रहिवाश्यांनी हायकोर्टात ही याचिका दाखल केली होती. खुल्या जागेत जनावरांची कुर्बानी दिल्याने अनेक प्रकारचे प्रदूषण तसेच आजार पसरण्याचा धोका असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते. पोलिसांत तक्रार देऊनही स्थानिक पोलिस दाद देत नसल्याने त्यांना नाईलाजाने हायकोर्टात धाव घ्यावी लागली, असे त्यांनी सांगितले आहे.