मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटच्या दरात केली कपात
मुंबईत कोरोनाकाळात महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवरील गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटच्या शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे सीएसएमटी, दादर, ठाणे, एलटीटी, कल्याण आणि पनवेल या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटसाठी ५० रुपये मोजावे लागत होते. मात्र आता सर्व निर्बंध शिथिल झाल्यानंतर मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटच्या दरात कपात केली आहे.
यासंदर्भातील निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, एलटीटी, कल्याण आणि पनवेल या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटसाठी ५० रुपयांऐवजी आता केवळ १० रुपये मोजावे लागणार आहे. प्लॅटफॉर्म तिकिटामधील ही कपात गुरुवार २५ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.