1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मे 2023 (07:24 IST)

बोगस नोटांच्या रॅकेटमध्ये दाऊद इब्राहिम टोळी सक्रिय

fake notes
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी मुंबई शहरात अचानक सहा ठिकाणी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत या अधिकार्‍यांनी घातक शस्त्रांसह डिजीटल उपकरणे आणि महत्त्वाचे आक्षेपार्ह दस्तावेज आदीचा साठा जप्त केला आहे. आतापर्यंतच्या कारवाईत या संपूर्ण प्रकरण कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे कनेक्शन समोर आले असून दाऊद अजूनही बोगस नोटांच्या तस्करीच्या गुन्ह्यांत सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
१८ नोव्हेंबर २०२१ रोजी ठाणे पोलिसांना एका हायफाय बोगस नोटांच्या तस्करीची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी कारवाई करुन दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपयांच्या बोगस नोटांचा साठा जप्त केला होता. या नोटा हुबेहुबे भारतीय चलनासारख्या होत्या. त्यांची छपाई पाहिल्यानंतर त्या बोगस नोटा आहे असे कोणीही सांगू शकणार नव्हते. याच गुन्ह्यांत रियाझ अब्दुल रेहमान शिखलीकर आणि नासीर चौधरीला अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले होते.
 
पोलीस कोठडीनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र सादर केले होते. न्यायालयीन कोठडीत असताना या दोघांनाही राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी ताब्यात घेतल्यानंतर या दोघांच्या चौकशीत या संपूर्ण प्रकरणा दाऊद इब्राहिमचे नाव समोर आले होते. ते दोघेही मूळचे मुंबईचे रहिवाशी होते. त्यामुळे त्यांच्या घरासह इतर नातेवाईकांच्या घरासह कार्यालयात एनआयएच्या अधिकार्‍यांनी कारवाई केली होती. या कारवाईत या अधिकार्‍यांनी बनावट नोटांची छपाईपासून ते चलनात आणणण्यासाठी लागणारे महत्त्वाचे पुरावे आणि दस्तावेज जप्त केले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor