शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (16:36 IST)

मुंबईतल्या लॉकडाऊनबाबत निर्णय २१ व २२ फेब्रुवारीनंतर घेणार

बईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये पूर्ण वेळ प्रवास करू देण्याबाबत आणि लॉकडाऊनबाबत निर्णय २१ व २२ फेब्रुवारीनंतर घेण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सोमवारी सांगितले.
 
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने सावधानतेचा इशारा देत लोकलमध्ये सर्वांना पूर्ण वेळा प्रवासाला मुभा इतक्यातच देता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, रुग्णांची संख्या वाढण्यामागे लोकल सुरु होणे हे एकमेव कारण आहे, असे सध्या तरी म्हणता येणार नाही, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले. लोकलमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळणे अवघड आहे. परंतु, आता हवाई वाहतूकही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. मोजक्या शहरातून किंवा मोजक्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होत्या, पण त्यांची संख्या वाढलेली आहे, असे सुरेश काकाणी म्हणाले.
 
आम्ही दर १५ दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेत आहोत. २१-२२ फेब्रुवारीला पुन्हा रुग्ण संख्येचा आढावा घेऊन सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाचा निर्णय घेण्यात येईल. तसेच, मुंबई महापालिका आणि आजूबाजूच्या महापालिका परिसरातील परिस्थिती विचारात घेण्यात येईल. त्यानंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेता येईल, असे सुरेश काकाणी यांनी नमूद केले.