रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (09:24 IST)

बाप्परे, थेट कोरोना रिपोर्टमध्ये केले फेरफार, पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ दाखल

मुंबईतील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना त्यामध्ये फेरफार करून निगेटिव्ह रिपोर्ट बनवल्याप्रकरणी पालिकेने या तिघांच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ दाखल केला आहे. आता पोलीस चौकशीत सदर कोरोना रिपोर्टमध्ये कोणी, कधी व कसा फेरफार केला हे उघडकीस येईल. प्राप्त माहितीनुसार, मुंबईतील खार येथे राहणाऱ्या एका ५३ वर्षीय व्यक्तीला त्यांची ५१ वर्षीय पत्नी आणि त्यांची १५ वर्षीय मुलगी यांच्यासह विमानाने जयपूरला जायचे होते. त्यासाठी त्यांनी कोरोना चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट एका खासगी लॅबने बनवला. त्यामध्ये या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे म्हणजेच कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे नमूद करण्यात आले होते. असे असतानाही या तिघांना प्रवास करता यावा आणि विमानतळावर अडवणूक होऊ नये म्हणून त्यांच्या रिपार्टमध्ये परस्पर फेरफार करून कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हचा निगेटिव्ह बनवण्यात आला. ही बाब समजल्यावर पालिकेकडून सूत्रे हलविण्यात आली. धक्कादायक म्हणजे या संपूर्ण कुटुंबाला पालिका आणि एअरपोर्ट प्रशासनाकडून विमानतळावरच अडवण्यात आले.
 
आरोग्य सेतु अ‍ॅपमुळे आणि पालिकेच्या एसओपीमुळे या तिघांना विमानात बसून उड्डाण करण्यापूर्वीच विमानतळावर अडवणे शक्य झाले. ज्या खाजगी लॅबकडून रिपोर्ट देण्यात आला तिथे त्यांची चौकशी केली असता या तिन्ही व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्हच दिला असल्याचे पालिकेला समजले. त्यामुळे एच/पश्चिम वॉर्डकडून खार पोलीस स्टेशनमध्ये या तिघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.