गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (08:30 IST)

मुंबई महानगर क्षेत्रात अडीशे ठिकाणी विनामूल्य आरटीपीसीआर, ऍण्टीजेन चाचणी उपलब्ध

मुंबईत कस्तुरबा येथे केलेल्या चाचणीत १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ बाधित असल्याचे आढळून आले आहेत.त्यामुळे कोणत्याही कोविड बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास, स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास तातडीने कोविड चाचणी करण्याचे आवाहन महापालिका केले आहे.यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात अडीशे ठिकाणी विनामूल्य आरटीपीसीआर आणि ऍण्टीजेन चाचणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
 
कोविड-१९ विषाणूचा डेल्टा प्रकार आतापर्यंत जगातील ११ देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे.याचा परिणाम म्हणून संभाव्य तिसरी लाट येऊ शकते,अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.कोविड लसीकरणामुळे संसर्गाच्या प्रसारास काहीसा आळा बसला असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे.यासाठी महापालिकेने पुन्हा काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
 
त्यानुसार चाचणीचे प्रमाण वाढविण्यात येणार असून अडीशे ठिकाणी त्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेचे दवाखाने,प्रसूतिगृह,विभाग कार्यालये तसेच कोविड केंद्रांमध्ये विनामूल्य आरटीपीसीआर आणि ऍण्टीजेन चाचणी केली जाणार आहे.या चाचणी केंद्रांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळ तसेच विभाग नियंत्रण कक्षांत उपलब्ध आहे.त्याआधारे आपल्या घरानजीकचे विनामूल्य कोविड चाचणी केंद्र आणि त्यांची वेळ,माहिती नागरिक प्राप्त करू शकतात.