वकिली नाही चालली म्हणून बनला ड्रग्ज पुरवठादार; मुंबईत गाझीपूरच्या एका तरुणाला अटक
मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी ड्रग्ज तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. १.२८ कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेला आरोपी व्यवसायाने वकील असून, अधिक पैसे कमावण्यासाठी त्याने वकिली सोडून ड्रग्ज पुरवठादार बनण्याचा निर्णय घेतला, असे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोशी पोलीस स्टेशनच्या ड्रग्ज स्क्वॉडच्या पथकाला दिंडोशीमध्ये ड्रग्जचा मोठा साठा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ योजना आखली आणि परिसरातील पाळत वाढवली. सॅटेलाइट टॉवर, हाय राइज टॉवर परिसराजवळ अंमली पदार्थ पोहोचवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख शिवाजी जयप्रकाश सिंग (३१), रा. गाझीपूर, उत्तर प्रदेश अशी पटली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीच्या बॅगेची झडती घेतली असता अंदाजे ६८० ग्रॅम एमडी अंमली पदार्थ सापडले, ज्याची अंदाजित किंमत ₹१.२५ कोटी ते ₹१.२८ कोटी आहे. आरोपीकडून इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली असून, त्यांची तपासणी सुरू आहे.

