शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (12:03 IST)

Mumbai rain: मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प

मुंबई शहर आणि उपनगरात आज (9 जून) सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. दादर (हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, गांधी मर्केट, अंधेरी, मालाड अशा काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर शीव ते कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे सध्या ठप्प आहे.
 
चुनाभट्टी रेल्वे ट्रॅकजवळ पाणी साचल्याने सीएसएमटी ते वाशी मार्गावरील हार्बर रेल्वे सेवा सुद्धा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.
 
कुलाबा वेधशाळेने मुंबई महानगर क्षेत्रात 10 ते 13 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर मुंबईत आजपासून मान्सून दाखल झाल्याचेही वेधशाळेने स्पष्ट केले. संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला मात्र अजून दोन दिवस लागतील, असा अंदाजही मुंबई हवामान विभागानं वर्तवला आहे.
 
कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी म्हटलं, "9 जूनपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू होईल. 11 जूनला अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पावसाचा प्रभाव सर्वाधिक उत्तर कोकणात असेल.
 
मुंबई, ठाणे, रायगड या भागात अतिवृष्टी होऊ शकते." त्यासाठी नागरिकांना गरज नसल्यास बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे."

नुकतंच तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान कोकणात बघायला मिळालं. त्यामुळे या अतिवृष्टीसाठी सरकारकडून पूर्वनियोजन करण्यात आले आहे. यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.