आयआयटी मुंबईच्या दोन मेस बंद करण्याच्या नोटिस, अनेक रेस्टॉरंटचे परवाने निलंबित
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथील दोन मेस सुविधांना कामकाज थांबवण्याच्या नोटिसा बजावल्या. आवश्यक परवानग्या आणि नोंदणी नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
पवई परिसरातील आयआयटीच्या वसतिगृह मधील मेस सुविधांच्या तपासणीदरम्यान ही बाब उघडकीस आली. नियामक प्राधिकरणाने त्यांना तात्काळ कामकाज थांबवण्याचे निर्देश दिले. वसतिगृह मधील मेसमध्येही त्रुटी आढळून आल्या, ज्यासाठी केटरिंग ऑपरेटरला नोटिसा बजावण्यात आल्या. नवीन एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी अन्न सुरक्षा मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक खानावळी आणि रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये दादर येथील मेसर्स ईट निनो प्रायव्हेट लिमिटेड आणि अंधेरी येथील मेसर्स जय माँ काली ढाबा यांचा समावेश आहे. नवी मुंबईतील पंजाब ग्रिलचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे. ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान ६३ रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ३८ जणांना सुधारणा सूचना देण्यात आल्या आणि सात रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहे .
Edited By- Dhanashri Naik
