रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (17:32 IST)

बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिकांनी रेल्वे रोखली

kid mobile
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडलीय. या घटनेनंतर सर्वत्र संतपाची लाट पसरलीय.
 
हजारोंच्या संख्येत बदलापूरमधील नागरिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. बदलापूर रेल्वे स्थानाकात रेल्वे रुळांवर उतरून नागरिकांनी रेल्वेमार्ग रोखून धरला आहे. गेल्या काही तासांपासून रेल्वे रोखल्यानं सीएसएमटी आणि कर्जत अशा दोन्ही दिशांना जाणाऱ्या रेल्वे ठप्प झाल्या आहेत.
 
पश्चिम बंगालमधील कोलकात्यात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणानं देशभरात संतापाची लाट असतानाच, महाराष्ट्रातील बदलापूरच्या या घटनेनं त्यात भर घातलीय. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
 
बदलापुरातल्या अत्याचाराच्या या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि गुन्हेगाराला तातडीनं शिक्षा व्हावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र, लोकांमधील संताप पाहता, पोलीसही हतबल अवस्थेत दिसून येत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 
तसेच, गुन्हा दाखल करण्यास हलगर्जी करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय, शाळेनेही या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना निलंबित केले आहे.
 
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जाऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक आंदोलकांसमोर त्यांना फारसं बोलता आलं नसल्याचं दिसून आलं. अखेरीस त्यांनी तिथून काढता पाय घेतला.
 
यावेळी गिरीश महाराजन म्हणाले की, "हे आंदोलन राजकीय प्रेरणेनं सुरू असल्याचं वाटतंय. आम्ही एसआयटी गठीत केली आहे." आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
 
आंदोलनामुळे रेल्वेचा खोळंबा, आताची स्थिती काय?
बदलापूर रेल्वेस्थानकात संतप्त नागरिकांनी आंदोलन सुरू केल्यानं रेल्वेमार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.
आज (20 ऑगस्ट) सकाळी 10 वाजल्यापासून या मार्गावरील रेल्वे ठप्प झाल्या आहेत. आंदोलनामुळे कर्जत आणि सीएसएमटी अशा दोन्ही दिशांना जाणाऱ्या ट्रेनचा खोळंबा झाला आहे.
सीएसएमटीहून कर्जत किंवा बदलापूरकडे जाणाऱ्या ट्रेन अंबरनाथपर्यंत सुरू आहेत. अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा मात्र पूर्णपणे ठप्प आहे.
 
नेमकं काय घडलं?
बदलापूरमधील नामांकित शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडली. वय 4 आणि 6 वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची ही घटना घडलीय. या दोन्ही चिमुकल्या मुली लघुशंकेसाठी जात असताना, शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने त्या दोघींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या घटनेचा निषेध म्हणून आज (20 ऑगस्ट) बदलापूरकरांनी 'बदलापूर बंद'ची हाक दिली आहे. हजारो नागरिकांनी शाळेसमोर ठिय्या देत आरोपीला कडक शिक्षेची मागणी केली आहे.
आंदोलकांच्या जमावामुळे उपनगरीय वाहतूक खोळंबली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावरही मोठ्या संख्येने नागरिकांनी ठिय्या देत रेलरोको केला आहे. आंदोलकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लावून धरली आहे.
 
पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण रेल्वे ट्रॅकवरून बाजूला होण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे. यामुळे बदलापूरहून कर्जत आणि सीएसएमटी दोन्ही दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल ठप्प झाल्या आहेत.
दरम्यान, बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापुरातील घटनेप्रकरणी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
"अशा घटना होऊ नयेत, यासाठी कायमस्वरुपी ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच, आरोपीला कठोर शासन व्हावे, यादृष्टीने खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा," असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "जर संस्थाचालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल."
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे रुळांवर आंदोलन करणाऱ्यांना शांततेचं आवाहनही केलंय
 
 
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, "बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांची त्वरित नियुक्ती करण्यात आली आहे."
तसंच, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "तात्काळ चार्जशीट दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल."
अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार आणि पोलीस विभाग प्रयत्नशील राहील, असंही फडणवीस म्हणाले
तसंच, बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
 
शाळेची मान्यता रद्द करावी - आदिती तटकरे
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
 
आदिती तटकरे म्हणाले की, "बदलापूर येथे चिमुकल्या मुलींसोबत झालेला प्रकार अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे. याबाबत विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. तसेच सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार आहे."
 
आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, "महिला व बालविकास विभागाच्या वतीने बाल हक्क संरक्षण आयोगाचाही अहवाल मागवून दोषींवर कडक कारवाईसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सोबतच, या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत सदर शाळेची मान्यताही रद्द करावी अशी मागणी आम्ही शालेय शिक्षण विभागाकडे करत आहोत."
राज्य महिला आयोगाने मागवला अहवाल
या घटनेप्रकरणी राज्य महिला आयोगाने आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत अहवाल मागवला आहे. या तातडीने योग्य ती कारवाई होईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
शाळेत कर्मचारी पुरवणारे कंत्राटदार, शाळा व्यवस्थापन यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे. असे प्रकार होऊ नये, यासाठी शाळा व्यवस्थापनाच्या पातळावर कारवाई झाली पाहिजे, असंही महिला आयोगाने नमूद केलं.
 
आरोपींना कठोर शिक्षा व्हावी - विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेचे गुणगाण गाते मात्र, विद्यार्थ्यांचे संरक्षण करू शकत नाही. सरकारची एकप्रकारे शो बाजी सुरू आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
उरण, बेलापूर, मीरा भाईंदरसारख्या घटना ताज्या असताना शाळेत अशी घटना घडणे हे निषेधार्ह आहे. या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
संतप्त नागरिकांना शांततेच आवाहन
बदलापूरचे आमदार किसन कथोरे म्हणाले, “या प्रकरणाबाबत काल (19 ऑगस्ट) उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेतली. याप्रकरणी त्यांनी फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा घ्यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, नागरिकांनी शांतता बाळगावी.”
 
या संस्थेची शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी लावण्यात आली असून तातडीने कारवाई होईल. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, नागरिकांनी संयम राखावा, असं आवाहन कथोरे यांच्याकडून करण्यात आलं आहे.
Published By- Priya Dixit