मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जानेवारी 2022 (15:27 IST)

गोव्यात आम्ही झोळी घेऊन उभे नाही; संजय राऊतांनी काँग्रेसला फटकारले

मुंबई: महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीसाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत प्रयत्नशील असताना पाहायला मिळत आहेत. मात्र, संजय राऊत यांच्या प्रयत्नांना काँग्रेसकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे. यावर बोलताना, गेल्या ५० वर्षांत काँग्रेस जिंकली नाही त्या जागा मागतोय. आम्ही झोळी घेऊन उभे नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
 
गोव्यात महाविकास आघाडीप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेस येणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून, काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. गोव्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगाची पुनरावृत्ती करण्यात काँग्रेसला अजिबात रस नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून भाजपला धूळ चारू शकतात, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.
 
आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही. राहुल गांधी यासाठी सकारात्मक आहेत पण गोव्याच्या स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात नक्की काय आहे, हे मला माहिती नाही. ४० पैकी ३० जागा काँग्रेसला लढण्यास आम्ही सांगितले आहे. उरलेल्या १० जागांवर मित्र पक्षांना लढण्याची संधी द्या. काँग्रेस गेल्या ५० वर्षात ज्या जिंकू शकली नाही त्या जागा आम्ही मागितल्या आहेत. काँग्रेसच्या खिशातल्या जागा आम्ही मागितलेल्या नाहीत. गोव्यात एकत्र लढलो नाही तर काँग्रेसचे एक आकडी आमदार सुद्धा निवडणून येणार नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे.