बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (17:41 IST)

किरीट सोमय्या यांचे ठिय्या आंदोलन, पोलिसांनी कारवाई करत घेतले ताब्यात

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. त्यांनी अंगात निषेधाचे बॅनर घालून किशोरी पेडणेकरांचा निषेध व्यक्त केला. मात्र त्यावेळी पोलिसांनी कारवाई करत सोमय्यांना ताब्यात घेतलं. 
 
“महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएच्या जागेचा गैरव्यवहार केला आहे. त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि त्यांची हकालपट्टी करावी. याबाबत आम्ही बीएमसी आणि एसआरएकडे कारवाईची मागणी केली आहे. पुरावेही सादर केले आहेत. जर 48 तासामध्ये पेडणेकर यांच्यावर कार्यवाही झाली नाही, तर मी महापालिका समोर धरणा आंदोलन करेन, असे सांगितले होते.
 
त्यानुसार किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश न दिल्याने त्यांनी मनपाच्या गेटसमोर हे आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान त्यांनी मुंबईच्या महापौरांची हकालपट्टी करा, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.
 
यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्या यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना पोलीस स्टेशनमध्येही नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही मला अटक करु शकत नाही, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांना कायदा समजवत त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.