मुंबईत साडीचा झोका खेळणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत
मुंबई- धारावी परिसरात एक हृदय पिळवटून टाकणार्या घटनेत झोका खेळत असताना 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
झोका घेण्याचा क्षणाभराचा आनंद चिमुकलीच्या जीवावर बेतला आहे. रविवारी संध्याकाळी घराच्या पोटमाळ्यावर साडीचा झोका बाधून खेळत असताना हा अपघात घडला आहे. अपघात घडल्यानंतर संबंधित मुलीला कुटुंबीयांनी तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचार सुरू असतानाच 13 वर्षीय मुलीची प्राणज्योत मालवली आहे.
या घटनेची माहिती समोर येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली गेली आहे तसेच पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
पोलिसांप्रमाणे 13 वर्षीय मृत मुलगी धारावीतील राजीव गांधी नगर परिसरातील रहिवासी असून रविवारी सायंकाळी ती नेहमी प्रमाणे आपल्या घराच्या पोटमळ्याला साडीने बांधलेल्या झोक्यावर खेळत असताना अचानक तिचा तोल गेला. अशात साडीचा फास तिच्या गळ्याभोवती आवळला त्यामुळे तिची शुद्ध हरपली. मुलीला फास बसल्याचं लक्षात येताच नातेवाईकांनी तातडीनं तिला खाली उतरवून सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असतानाच संबंधित मुलीचा मृत्यू झाला आहे.