1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (18:01 IST)

अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करु, केडीएमसीला दिला इशारा

मुंबईतील कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या स्कायवॉकवर प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे. अस्वच्छतेमुळे स्कायवॉकवर नेहमी दुर्गंध पसरलेला असतो. त्यामुळे स्कायवॉकवरील घाणीचं साम्राज्य हटवा, स्कायवॉकची योग्यप्रकारे निगा राखा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करु, असा इशारा कल्याण पूर्वचे मनसेचे विभाग अध्यक्ष विवेक धुमाळ यांनी केडीएमसीला दिला आहे.
 
विवेक धुमाळ यांनी स्कायवॉकवर फेसबुक लाईव्ह करत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. याशिवाय त्यांनी याबाबत केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्कायवॉकची डागडुजी करुन स्वच्छ करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर त्यांनी स्कायवॉकवर फेसबुक लाईव्ह करत पुन्हा केडीएमसीला इशारा दिला.
 
“कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलावर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या पुलावर मलमूत्र, अस्वच्छता, गडदुल्ले यांचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. केडीएमसीच्या उपायुक्तांनी यापुढे स्कायवॉकवरील पुलाच्या स्वच्छतेसाठी काम करु, त्या कामाचा पाठपुरावा करु, असं आश्वासन दिलं आहे”, असं विवेक धुमाळ यांनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं आहे.