रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (16:34 IST)

तर कदाचित 'ते' मुख्यमंत्री झाले असते : दानवे

‘पक्षाने एकनाथ खडसे यांना प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली. त्यामुळे त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळाली. मग पुढे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. जर एकनाथ खडसे यांनी तेव्हाच प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले असते तर कदाचित ते मुख्यमंत्री झाले असते. असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. 
 
फक्त चंद्रकांत पाटील यांनी पक्ष सोडू नये यासाठी फोन केला होता, असे खडसे म्हणाले होते. यावर एका मराठी वृत्तवाहिनी बोलताना दानवे म्हणाले की, ‘मी एकनाथ खडसे यांच्या फार्माहाउससह घरी आणि सरकारी बंगल्यावरही गेलो होतो. खडसे यांना मी समजावलं नाही. पण आमच्या राजकारणावर चर्चा झाली. पण राष्ट्रवादीने खडसेंचा वापर राज्याचा भल्लासाठी करावा, विरोधकांसाठी करू नये’, अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्ती केली आहे.
 
‘भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी खडसेंना विचारण्यात आले होते. पण तब्येतीचे कारण देऊन त्यांनी हे पद नाकारले. त्यांना प्रदेशाध्यक्ष पदापेक्षा मंत्रिपदात अधिक रस होता’, असे दानवे यांनी सांगितले.
 
पुढे दानवे म्हणाले की, ‘खडसे आमचे नेते होते. पक्ष सोडल्याचे आम्हाला दुःख आहे. पण या पक्षांतराचा परिणाम फारसा होणार नाही. माणसावर पक्ष आधारित नसतो. गावागावत भाजपचे कार्यकर्ते आहेत. तसेच नाथाभाऊ यांच्यासोबत एकही आमदार आणि पदाधिकारी जाणार नाही. भाजपासाठी खडसे हा विषय आता संपलेला आहे.’