1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (14:00 IST)

मुंबईचा डबेवाला कामगार पाच दिवसांच्या सुट्टीवर चालला

mumbai tiffin
मुंबईच्या चाकरमान्यांना वेळेवर डबा पोहचवणारा मुंबईचा डबेवाला कामगार पाच दिवसांच्या सुट्टीवर चालला आहे. 13 एप्रिल वार बुधवार ते 17 एप्रिल वार रविवार पर्यंत डबेवाला कामगार सुट्टीवर चालला आहे. ग्रामदैवत, कुलदैवताच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी डबेवाले आपल्या मुळ गावी जाणार आहे.
 
मुंबईचा डबेवाला कामगार हा पुणे जिल्हयातील प्रामुख्याने खेड ( राजगुरूनगर ) मावळ, या तालुक्यांतून व काही अंशी मुळशी,आंबेगाव, जुन्नर, या तालुक्यांतून मुंबईत येतात. या तालुक्यांतील गावो गावच्या यात्रेचा हंगाम चालू झाला आहे. गेली दोन वर्ष करोनामुळे गावो गावच्या यात्रा बंद होत्या. या यात्रेत सहभागी होण्यासाठी व बैलगाडा शर्यत पहाण्यासाठी डबेवाला कामगार उत्सुक आहे. यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच कुळाचाराचे सोपस्कार पार पाडण्यासाठी डबेवाला कामगार आपल्या गावाला जातात. त्यामुळे पाच दिवस त्यांची सेवा बंद राहणार आहे.
 
या पाच दिवसाच्या सुट्टीच्या कालावधीत दोन शासकीय सुट्या येत आहेत व शनिवार रविवार येत आहे. त्या मुळे बहुतांश आस्थापना मधिल डबे बंद आहेत व परीक्षा कालावधी असल्या मुळे कॅान्हेंन्ट शाळेचे डबे बंदच आहेत, काही कार्यालयांना रजा आहे त्या मुळे डबेवाल्यांच्या सुट्टीचा ग्राहकांना जास्त त्रास होणार नाही. तरी ही काही ग्राहकांची गैरसोय होणार आहे त्या बद्दल डबेवाला कामगार दिलगीरी व्यक्त करीत आहे. तसेच या सुट्टीचा डबेवाला कामगार यांचा पगार ग्राहकाने कापू नये, असे आवाहन “मुंबई डबेवाला असोशिएशन” ने ग्राहकांना केले आहे.